By  
on  

बिग बॉस मराठी 2: 'वीकएंड च्या डावात' महेश मांजरेकरांनी घेतला शिवानी सुर्वेचा खरपूस समाचार

'बिग बॉस मराठी 2' सुरु होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. स्पर्धकांनी या आठवड्यात बिग बॉस मध्ये जो धुडगूस घातला त्याचा समाचार घेण्यासाठी महेश मांजरेकर हे वीकएंड च्या डावात घरातील सदस्यांना भेटायला आले आहेत. यामध्ये मांजरेकरांनी शिवानी सुर्वेची शाळा घेतली. 

शिवानी सुर्वेने या आठवड्यात अनेक जणांशी भांडणं केली. वीणा जगताप आणि शिवानी या दोघींचं भांडण इतकं टोकाला गेलं की दोघींनी एकमेकांवर हात उचलले. या सर्व प्रकरणावर महेश मांजरेकर यांनी शिवानीला खडे बोल सुनावले. शिवानीने स्वतःचा राग ताब्यात ठेवावा असा परखड सल्ला महेश मांजरेकरांनी दिला. वीणा आणि शिवानीमध्ये जो काही शारीरिक हिंसाचार झाला त्यावर सुद्धा मांजरेकरांनी बोट ठेवून दोघींना त्यांच्या चुकीच्या वागण्याची जाणीव करून दिली. 

मांजरेकर बोलत असताना घरातील सदस्य मध्ये मध्ये बोलत होते. या गोष्टीचा त्यांना राग येऊन ''मी बोलत असताना कोणीच मध्ये बोलणार नाही हा इकडचा नियम सर्वांनी लक्षात ठेवा'' अशा मोठ्या आवाजात त्यांनी सर्वांना सुनावलं. यावेळी पराग मांजरेकरांच्या मोठ्या आवाजाला घाबरून जे बोलायचं होतं तेच विसरला. 

तत्पूर्वी बिग बॉसच्या घरात शिवानी आणि वीणा या दोघींवर खटला चालवण्यात आला होता. दोघींनी एकमेकांवर हात उचलल्यामुळे  बिग बॉसच्या आदेशाप्रमाणे दोघींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं. शिवनीच्या बाजूने वैशाली माडे तर वीणाच्या बाजूने पराग कान्हेरे वकील म्हणून होते. अभिजीत बिचुकले या खटल्याचे न्यायाधीश होते. अखेर वैशालीने अत्यंत हुशारीने आणि मुद्देसूदपणे शिवनीची बाजू मांडली आणि शिवानीची या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली. 

या आठवड्यसाठी पराग कान्हेरे हा सुरक्षित झाला असून अभिजीत केळकर, मैथ्थिली जावकर, वीणा जगताप, माधव देवचके, नेहा शितोळे या पाच जणांपैकी या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे आजच्या भागात प्रेक्षकांना कळून येईल. 

Recommended

PeepingMoon Exclusive