By  
on  

बिग बॉस मराठी 2: ''बिचुकलेला चपलेने हाणला पाहिजे'', मेघा धाडे

 बाउन्स चेक प्रकरणातून सातारा पोलीस दलाने काल बिचुकलेंना बिग बॉसच्या घरातून अटक केली. याप्रकरणात अनेक स्तरांकडून चांगल्या वाईट प्रतिक्रिया येत आहेत. 

एका आघाडीच्या वृत्तवाहिनीने बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिजनची विजेती मेघा धाडेला यासंबंधी विचारलं असता तिने बिचुकलेंच्या अटकेचे समर्थन केले,''अभिजीत बिचुकले या माणसाला अटक झाल्याचा मला आनंद आहे. गेल्या काही दिवसांपासून मी कार्यक्रम पाहते आहे, तेव्हा पासून माझे रक्त खवळते आहे. महिलांशी बिचुकले ज्या पद्धतीने वागतो आहे ते निंदनीय आहे . विशेषतः रुपालीबाबत तो जे वागला ते अत्यंत असभ्य आणि लाज वाटणार आहे. असा माणूस त्या घरात असणे त्या घरासाठी हे संपूर्ण शो साठी कलंक आहे. त्या घराची शान हा माणूस घालवतोय. तो स्वतःला फार मोठा नेता समजतो. परंतु हा स्वघोषित नेता आहे. हा आतापर्यंत एकही निवडणूक तो जिंकलेला नाही. चार टवाळक्या करणाऱ्या पोरांना एकत्र घेऊन भटकलं की माणूस राजकारणी होत नाही.''

 

मेघा पुढे म्हणाली,''अशा असभ्य वर्तन असलेल्या माणसाला चपलेने हाणलं पाहिजे. मी जर खरंच बिग बॉसच्या घरात गेली तर त्याचे काय करेल मला सांगता येत नाही. तो बिग बॉसच्या घरात आतापर्यंत ज्या पद्धतीने वागला आहे त्यामुळे याला अटक झाली असेल तर ते योग्यच झाले आहे. कारण हीच त्याची जागा आहे. त्याने तिथेच राहावं. बिग बॉसच्या घरात राहण्याची या माणसाची लायकी नाही. हा मला एक मनोरुग्ण वाटतो. मी खूप तीव्रतेने बोलते आहे, पण हे बोलण्यामागे माझ्या ज्या भावना आहेत, या कदाचित संपूर्ण स्त्री वर्गाच्या असतील.'' असं परखड मत मेघाने व्यक्त केलं. 

 

एकूणच बिचुकलेंना अटक झाल्यानंतर त्यांच्या बिग बॉसच्या अस्तित्वावर आता प्रश्नचिन्ह उमटले आहे. आज बिचुकलेंना सातारा कोर्टासमोर या प्रकरणाची सुनावणी कारण्यासाठी हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे बिचुकलेंचं बिग बॉसमधील भविष्य आता कोणतं वळण घेईल याचा लवकरच सर्वांना उलगडा होईल. 

(Source: Times Now)

Recommended

PeepingMoon Exclusive