'दम धर रे लेकरा हात चालवू दे मले भरभर तेथं लेकरं हजार वाट पाह्यते मंडईवर...' चतुर्थीनिमित्त तेजस्विनीचा शेतक-यांना सलाम

By  
on  

आपल्या नवरात्री स्पेशल फोटोशूटमधून दरवर्षी अभिनेत्री तेजस्विनी पंडित काही ना काही सामाजिक संदेश देत असते. यंदा ती कोरोनायोध्द्यांना आपल्या फोटो Illustration मधून ट्रिब्यूट देत आहे. डॉक्टर, पोलिस, सफाई कामगार यांना सलाम केल्यानंतर तेजस्विनीने आज चतुर्थीनिमित्त जगाचा पोशिंदा शेतक-यांना आपल्या फोटोशूटमधून दंडवत केलं आहे. 

तेजस्विनी शेतकरी महिलेच्या रुपात या फोटोत पाहायला मिळतेय. पाठीवर बाळ घेऊन ती शेती करताना दिसतेय. तिने ह्या फोटोला फार हद्यस्पर्शी कॅप्शन दिलं आहे. ती म्हणते, "शिवारात या माह्या..कदी आभाय फुटलं, कदी धरिनी रुसली..पन माय हे तुयी हर दैवाशी भांडली..दम धर रे लेकरा हात चालवू दे मले भरभर...तेथं लेकरं हजार वाट पाह्यते मंडईवर..." याचाच अर्थ कितीही संकंट आली तरी जगमगून न जाता मला माझं काम केलंच पाहिजे, ही शेतक-यांची आपल्या बळीराजाची गाथा ह्या शेतकरी महिलेच्या रुपात तेजस्विनीने मांडली आहे. 

पाठीवर बाळाला बांधून शेतात काबाडकष्ट करणा-या शेतकरी आईचे रूप धारण करून जणू अन्नपूर्णा देवीचं शेताच्या बांधा-यावर राबत असल्याचा भास ह्या फोटोतून होतो आहे. ह्या फोटोशूटविषयी तेजस्विनी पंडित म्हणते, “वर्क फॉर्म होम करण्याची मुभा नोकरदार माणसांना असते. शेतक-याला कसलं आलंय, वर्क फॉर्म होम... अतिवृष्टी होवो, वा दुष्काळ पडो, टोळधाडीचं संकट येवो वा कोरोना... कुठलीही नैसर्गिक, प्राकृतिक आपत्ती आली तरी, अन्नदात्याला मात्र लॉकडाऊनमध्ये बसता येत नाही. त्याला उन्हा-तान्हात, पावसा-पाण्यात, थंडी-वा-यात कंबर कसून काम करावेच लागते.”

तेजस्विनी सांगते, “आपल्याकडे अन्नपूर्णादेवीची आराधना करण्याची प्रथा आहे. आपल्यासाठी शेतात 365 दिवस राबणारी ही शेतकरी महिला अन्नपूर्णाच तर आहे. आपल्या तान्हुल्याला पाठीशी बांधून तिने काम केले नाही, तर आपली कुठली पोटाची खळगी भरणार.. त्यामूळेच आपल्यापर्यंत ‘अन्न हे पूर्णब्रम्ह' पोहोचवणा-या’ अन्नदात्याचे शतश: आभार.’

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share