By  
on  

‘पोश्टर बॉईज’च्या सिक्वेलमध्येसुध्दा झळकणार तेच कलाकार : श्रेयस तळपदे

नसबंदीसारखा आगळा-वेगळा पण महत्त्वपूर्ण विषय घेऊन सर्वत्र धम्माल उडवून देणारा 'पोश्टर बॉईज' या सिनेमानं प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं. मराठीसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता श्रेयस तळपदेने या सिनेमाची निर्मिती केली होती. ऋषिकेश जोशी, दिलीप प्रभावळकर आणि अनिकेत विश्वासराव यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा तरुणांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच मनात घर करुन गेला. आता या सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर जवळपास चार वर्षांनी श्रेयस पुन्हा आता या सिनेमाच्या सिक्वेलची तयारी करतोय.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, श्रेयस म्हणाला “लवकरच आम्ही पोश्टर बॉईजचा सिक्वेल घेऊन येत आहोत. यासाठी आम्ही तयारीला लागलो आहोत. सिनेमाचा विषय फायनल झाला असून फक्त स्क्रीनप्ले आणि संवाद यांच्यावर अजून काम सुरु आहे. जर तारखा वगैरा सर्वकाही सुरळीत सुरु झालं तर आम्ही लवकरच या सिक्वेलचं शूटींग सुरु करणार आहोत आणि पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत सिनेमा रिलीजही करु.”

श्रेयस पुढे सांगतो, “पोश्टर बॉईजचा सिक्वेलसुध्दा पहिल्या भागाप्रमाणे धम्माल-मस्ती घेऊन येईल, तसंच सामाजिक संदेशसुध्दा देईल पण यावेळेस तो थोडा हटके असेल आणि प्रत्येकाला आपल्या जवळचा वाटेल. सिनेमाच्या सिक्वेलमध्ये पहिल्या भागातीलच कलाकार असतील तर मी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेन”

सर्वांनाच आता श्रेयसच्या पोश्टर बॉईजच्या सिक्वेलची आतुरता लागून राहिली आहे.

दरम्यान श्रेयस यंदा वेबसिरीजमध्ये पदार्पण करतोय. ‘बेबी कम ना’, असं या वेबसिरीजचं नाव असून यात त्याच्यासोबत चंकी पांडे, किकू शारदा आणि शेफाली झरीवाला हे कलाकार झळकणार आहेत. या नवीन माध्यमातून प्रेक्षकांसमोर येण्यास श्रेयस खुप उत्सुक आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive