आपल्या सुरेल आवाजाने चाहत्यांच्या मनावर मोहिनी घालणारी गायिका आणि डॉक्टर नेहा राजपाल आता एका नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. संगीत क्षेत्रात नाव कमावल्यावर नेहा आता पुन्हा एकदा मेडिकल प्रॅक्टीकलला सुरुवात करत आहे. यावेळी पीपिंगमून मराठीशी एक्स्लूसिव्ह गप्पा मारताना नेहाने अनेक बाबी विषद केल्या आहेत. नेहा म्हणते, ‘खरं तर मला प्रॅक्टीस करण्याची खुप इच्छा होती.
पण पासआऊट झाल्यानंतर सा रे ग म प जिंकल्यानंतर मी लगेच गायन क्षेत्राकडे वळले. याशिवाय माझी मुलगी आलियाचा जन्म झाला. त्यामुळे प्रॅक्टीस मागे पडत गेली. पण आता आलियाची दहावी झाल्याने मला थोडा वेळ मिळतो आहे. त्या वेळेचा सदुपयोग करत मी पुन्हा प्रॅक्टीसला सुरुवात केली आहे. अर्थात माझं गाणं ही सुरुच असेल. आठवड्यातील तीन दिवस मी प्रॅक्टीस करत आहे. त्यामुळे मी इतर वेळ गाण्यासाठी नक्कीच देऊ शकते.
सध्याच्या करोनाच्या परिस्थितीवर नेहाने सांगितलं आहे. नेहा म्हणते, ‘ खरं तर करोनामुळे झालेलं स्लो डाऊन ही निसर्गाने आपल्याला दिलेली संधी आहे. आपल्यावर आधीपासून रुमाल बाळगण्याचे, हात धुण्याचे संस्कार झाले आहेत. काळाच्या ओघात हे सगळं मागं पडत गेलं आहे. पण आता हे पुन्हा आठवण्याची गरज निर्माण झाली आहे. याशिवाय मास्क वापरणं ही गरजेचं आहे. मास्कमुळे स्वत:मध्ये एक प्रकारची जबाबदारी येते. सरकार मदत करत आहेच. पण आपणही काळजी घेणं गरजेचं आहे.’