By  
on  

Exclusive :   जितेंद्र जोशीच्या आधी 'बेताल'च्या मुधलवनची भूमिका साकारणार होता दुसरा मराठी अभिनेता, जितेंद्रने शेयर केला अनुभव 

नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली किंग खान शाहरुकच्या रेड चिलीजची वेब सिरीज ‘बेताल’ची सध्या सगळीकडे चर्चा आहे. अभिनेता जितेंद्र जोशी या सिरीजमध्ये मुधलवन नावाचा खलनायक साकारतोय. पिपींगमून मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत जितेंद्रने या सिरीजविषयीच्या काही एक्सक्लुझिव्ह गोष्टी शेयर केल्या आहेत. ही भूमिका जितेंद्रला ऑफर होण्याआधी दुसऱ्या मराठी कलाकाराला ती ऑफर झाली असल्याचही तो सांगतो. 
‘बेताल’ करण्याची महत्त्वाची कारणे त्याने यावेळी सांगीतली. जितेंद्र म्हणतो की, “नेटफ्लिक्सवर काटेकरनंतर मी दुसरं काही केलं नव्हत. वाट बघत होतो की चांगल्या गोष्टी येतील माझ्यापर्यंत याची. ‘बेताल’ जेव्हा ऑफर झाला तेव्हा माझ्याआधी तो  मराठीतल्या एका उत्तम अभिनेत्याकडे गेला होता. पण हा रोल माझ्याकडे आला.  जेव्हा  मी हा रोल ऐकला तेव्हा असं वाटलं की हा रोल सोडूच शकत नाही. ‘बेताल’चा भाग होण्यासाठी नेटफ्लिक्स, शाहरुख खान आणि मुधलवनचा रोल या तीन गोष्टी मुख्य कारणे आहेत.”
‘बेताल’ मधील दुष्ट खलनायक साकारण्याविषयीचा अनुभव यावेळी जितेंद्रने शेयर केला. तो सांगतो की, “ते करत असताना तुम्हाला आतून त्रास होत असतो पण तुम्हाला ते करायलाही मजा येते. अभिनय हा माझा व्यवसाय आहे त्याच्यासोबत ती माझी आवड सुद्धा आहे.  काही रोल असे असतात की जे तुम्हाला व्यवसाय म्हणून पुढे घेऊन जातात आणि यातून त्याचं पुरेपुर समाधान सुद्धा मिळत असतं. तर त्या पद्धतिची ही भूमिका होती.”
 
‘सेक्रेड गेम्स’ या प्रसिद्ध वेब सिरीजमध्ये जितेंद्रने साकारलेली काटेकरची भूमिकाही प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.  त्या भूमिकेनंतर ही अत्यंत वेगळी भूमिका जितेंद्रने साकारली आहे. याविषयी तो सांगतो की, “मी काटेकर करत असताना माझा मराठी प्रेक्षक जो मला ओळखतो, त्यांना मजा आली की आपला माणूस हा तिथे हिंदीमध्ये झळकतो. माझ्या हातात एक गोष्ट असते की पुढचं कॅरेक्टर हे इतकं निराळं असलं पाहिजे की त्याचा त्या आधीच्या कॅरेक्टरशी काही संबंध नसेल तर लोकं विचार करतील की या पद्धतिचं कामही तो करु शकतो. कामातलं वैविध्य दाखवू शकलात तर मजा येते." 

या सिरीजमधील मुधलवन या खलनायकाची प्रचंड चिड येते, म्हणजेच जितेंद्रने या भूमिकेला पुरेपुर न्याय दिलाय आणि हेच जितेंद्रच्या कामाचं यश आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive