By  
on  

Exclusive : जुलैमध्ये सुरु होणार ‘समांतर-2’चं चित्रीकरण, अशा पद्धतिने करणार नियमांचं पालन 

लॉकडाउनच्या काळात विविध वेबसिरीजने घरात बसलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलय. अर्थात या काळात वेब प्लॅटफॉर्मच्या प्रेक्षकांच्या संख्येत वाढ झाली. यातच लॉकडाउनच्या काळात प्रदर्शित झालेल्या ‘समांतर’ या वेब सिरीजने प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन केलं. या वेब सिरीजच्या यशानंतर आता या वेब सिरीजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 
राज्य सरकारने काही नियम आणि अटींचं पालन करून चित्रीकरणास परवानगी दिल्यानंतर आता या नियमांचं पालन करत ‘समांतर-2’ च्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. येत्या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात या वेब सिरीजच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचं निर्माते कार्तिक निशाणदार यांनी पिपींगमून मराठीशी बोलताना सांगीतलं आहे. ते सांगतात की, “समांतरला प्रेक्षकांचं भरपुर प्रेम मिळालं 100 मिलीयन पेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. आता समांतर-2 आम्ही घेऊन येत आहोत. येत्या जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये चित्रीकरण सुरु करणार आहोत. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये वेब सिरीज प्रदर्शित करण्याची आमची इच्छा आहे.”


शिवाय नियमावलींचं पालन करत या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचही ते बोलले. या नियम आणि अटी लक्षात घेत निर्मात्यांपुढे मोठी आव्हानं आहेत. त्यासाठीचं नियोजन निर्माते कार्तिककही करत असल्याचं त्यांनी सांगीतलं. ते सांगतात की, “सगळ्या नियमांचं पालन करून, काळजी घेऊनच आम्ही आता लवकरच ऑन फ्लोअर जात आहोत. आम्ही या सगळ्या नियमांचं पालन करणार आहोत. सगळ्या डिपार्टमेंटच्या नियमांचं पालन करत, कोव्हिड ऑडिट बसवून आम्ही सुरक्षीततेची काळजी घेणार आहोत.”

प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथा लेखक सुहास शिरवळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित ही वेब सिरीज आहे. सतिश राजवाडे यांनी या वेब सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनेता स्वप्निल जोशीचा हा वेब डेब्यू असून तो यशस्वी ठरलेला आहे. याशिवाय अभिनेत्री तेजस्विनी पंडितचाही हा वेब डेब्यू होता. कृष्णच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले नितीश भारद्वाज यांनी या वेब सिरीजमध्ये सुदर्शन चक्रपाणी ही भूमिका साकारली आहे. तेव्हा या भविष्याचा वेध घेणारी रहस्यमयी कहाणी असलेल्या वेब सिरीजचा अपूर्ण शेवट पूर्ण करण्यासाठी ‘समांतर’च्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आता वाट पाहत आहेत. एम एक्स प्लेयरवर ही वेबसिरीज प्रदर्शित करण्यात  आली होती. 
याशिवाय निर्माते कार्तिक निशाणदार ‘नक्सल’ ही हिंदी वेब सिरीजही घेऊन येणार आहेत. येत्या 15 दिवसांमध्ये या वेब सिरीजचही चित्रीकरण सुरु होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive