By  
on  

गायिका शाशा तिरुपती सांगतेय, तिच्या आणि मराठी गाण्यांच्या दृढ नात्याविषयी

संगीत क्षेत्रात खुप कमी वेळात आपलं नाव राष्ट्रीय पुरस्कारावर कोरणारी गायिका म्हणजे शाशा तिरुपती. साशाने आतपर्यंत हिंदी, तमिळ, इंग्रजी अशा अनेक भाषांमधून गाणी गायली आहेत. शाशाने अलीकडेच काही मराठी गाण्यांनाही सुंदर आवाज दिला आहे. ‘कॉफी आणि बरंच काही’ आणि आता ‘कागर’ आणि ‘पाणी’ या सिनेमातील गाण्यांनाही शाशा ने आपल्या आवाजाने सजवलं आहे. शाशाने मराठी गाणी गातानाचा अनुभव पीपिंगमूनशी शेअर केला आहे.

संगीत क्षेत्रात अनेक ट्रेंड येत असताना अनेक नवीन प्रयोग होत असताना तुला कोणत्या प्रकाराशी जास्त जवळीक वाटते?

कोणत्याही संगीताकडून माफक अपेक्षा असते ती मनात उतरण्याची. मनाला स्पर्श करणारं संगीत मला कायमच जवळचं वाटतं. तुम्ही आर्मेनियन, इलेक्ट्रॉनिक, बॉलिवूड, प्रादेशिक यांसारख्या कोणत्याही प्रकारचं संगीत ऐका. पण जे थेट मनाला भिडत तेच संगीत सगळ्यात जवळचं वाटतं. त्यामुळे साधारणत: कोणतंही संगीत ऐकताना माझाही हाच क्रायटेरिया असतो. त्यामुळे आत्मशांती देणारं संगीत मला खुप आवडतं.

तू मराठी गाणी गायली आहेसच, पण तू इतर भाषांमधील गाणीही गायली आहेस. पण इतर भाषांमध्ये गाताना तुला कम्फर्ट झोन सोडून बाहेर आल्यासारखं वाटतं का?

खरं तरं रेकॉर्डिंगवेळी अनेक लोक असतात ज्यांच्यामुळे कम्फर्टेबल वाटतं. माझ्यामते कोणत्याही गायकाला इतर भाषेतील गाणी गाताना अजिबात त्रास होत नाही. कारण आम्ही त्या भाषेतील इतर गाणी ऐकून शिकतो. त्यामुळे शब्दांचं आकलन योग्य प्रकारे होण्यास मदत होत असते. त्यातही मराठी भाषेतील गाणी गाताना शब्दांवर विशेष लक्ष केंद्रित करावं लागतं. कारण मराठीतील गाणी अर्थभारित असतातच पण शब्दांच्या उच्चारावरही लक्ष केंद्रित करावं लागतं. ‘कागर’मधल्या गाण्यात बोल संगीत माझ्या भाषेतील नसलं तरी एक कलाकार म्हणून मी काहीतरी वेगळं देऊ शकले याचं समाधान आहे. गाणं ऐकताना तुम्हालाही ते जाणवेल.

 मराठी गाण्याबद्दल तुला काय वाटतं?

मी खुप आधीपासून मराठी गाणी ऐकत आलेली आहे. अनेक गायकांना ऐकलं देखील आहे. अजय-अतुलसर, पंडित हृदयनाथ मंगेशकर, शंकर महादेवन सर यांची गाणी खुप ऐकली आहेत. पंडितजींच्या गाण्याची मी खुप मोठी फॅन आहे. ‘मी रात टाकली’ हे गाणं माझ्या खास जवळचं आहे. ‘सैराट’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ यातील गाणीही माझी आवडती आहेत. मराठीत दर्जेदार संगीत आहे यात शंकाच नाही. मला त्याचा भाग होता आलं याचा आनंद आहे. ‘पाणी’नावाच्या मराठी सिनेमातही एक गाणं गायलं आहे. ते गाणंही मातीशी जोडून ठेवणारं असल्याने गाताना मजा आली.

 तुझे आगामी प्रोजेक्टस कोणते आहेत?

माझं एक इंग्रजी गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. माझं स्वतंत्ररित्या गायलेलं पहिलंच इंग्रजी गाणं आहे. ‘Strings of air’ असे त्याचे बोल आहेत. याशिवाय इतर सिनेमे आहेतच.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive