By  
on  

ऑनलाईन नाटक ‘मोगरा’च्या संगीतासाठी अजित परब यांच्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव

मराठीतील आजचा आघाडीचा संगीत दिग्दर्शक अजित परब यांनी ‘नेटक डॉट लाईव्ह’चे पहिले नेटक अर्थात इंटरनेटवरील लाईव्ह नाटक ‘मोगरा’ला दिलेले संगीत सध्या खूप गाजते आहे. अशाप्रकारचे हे इंटरनेटच्या माध्यमातून सादर होणारे पहिलेच नाटक असल्याने जरी मी एक्साईट झालो असलो तरी त्यात अनेक अडचणी आल्या आणि त्यावर मात करत, मार्ग काढत जे काम समोर आले ते आनंद देणारे होते, असे सांगताना अजित परब  यांनी हे माध्यम हे आता भविष्य आहे असेही नमूद केले आहे.

हृषिकेश जोशी यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेले इंटरनेटवरील पहिले ऑनलाईन नाटक म्हणून सध्या ज्याची चर्चा होत आहे, त्या ‘मोगरा’ला अजित परब यांनी संगीत दिले आहे. हृषिकेशशिवाय स्पृहा जोशी, भार्गवी चिरमुले, गौरी देशपांडे, मयुर पालांडे आणि वंदना गुप्ते हे आघाडीचे कलाकार यात आहेत आणि विविध शहरे आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी या नाटकाचे प्रयोग झाले आहेत. नाटकातील पाचही व्यक्तिरेखांना संगीताचा वेगवेगळा प्रकार वापरत एक वेगळा प्रयोग त्यांनी या नाटकात केला आहे.  त्यामुळे या नाटकाचे संगीत दिग्दर्शन अधिक मनोरंजक आणि उत्कंठावर्धक झाले,. 

“मोगरा’ला संगीत देशील का, विचारण्यासाठी माझा मित्र हृषिकेशने मला फोन केला आणि ती संकल्पना ऐकूनच मी एक्साईट झालो. कारण असा प्रयोग आत्तापर्यंत माझ्या माहितीत तरी झालेला नाही. अशाप्रकारे ऑनलाईन प्रयोग होणार आहे आणि त्याचे संगीत दिग्दर्शन करायचे आहे, याचे अप्रूप होते. जेव्हा तालमी सुरु झाल्या तेव्हा मात्र ऑनलाईन नाटकाला संगीत देण्यामागील अडचणी, मर्यादा  लक्षात येवू लागल्या.  ते कसे ऐकू येणार आहे, संगीतामधील लोज किंवा फ्रीक्वेंशी ज्या कट होतात ते ऑनलाईन कसे साधायचे याचा विचार करत त्यादृष्टीने काम करणे गरजेचे होते. यातील ज्या पाच व्यक्तिरेखा आहेत त्या सर्वांना संपूर्णतः वेगळे पाच संगीत प्रकार वापरायचे आम्ही ठरवले आणि त्यामुळे हा प्रयोग अधिकच इंटरेस्टिंग झाला आणि त्यामुळे अधिक मजा आली ,” अजित परब सांगतात.

“ऑनलाईन नाटकाचा हा जो प्रकार आहे, त्याची नाट्यगृहातील नाटक, सिनेमा किंवा टेलीव्हीजनशी तुलना करता येणार नाही. हे संपूर्ण वेगळे व्यासपीठ आहे आणि त्याच दृष्टीने त्याकडे पाहिले पाहिजे. त्यात भविष्यात वेगवेगळे प्रयोग होणार आहेत. त्यामुळे मला वाटते म्युझीकली हे एक वेगळे आव्हान आहे आणि तेवढाच गमतीशीर हा  अनुभव आहे. मला या नाटकाबद्दल व या व्यासपिठाबद्दल प्रचंड उत्कंठा आहे आणि त्यातून प्रेक्षकांसाठी मनोरंजनचे नवीन दालन खुले झाले आहे. हा प्रकार केवळ लॉकडऊनपुरता मर्यादित राहणारा नाही तर त्यानंतरही हे दालन सुरूच राहणार आहे. मला पूर्ण खात्री आहे की प्रेक्षक या ऑनलाईन नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील,” या नवीन व्यासपीठाबद्दल बोलताना परब म्हणतात.

आपल्या  आगामी प्रोजेक्टबद्दल बोलताना ते म्हणतात, “लवकरच ‘बदामराजा’ हा अभिवाचनाचा एक आगळा कार्यक्रम रंगभूमीवर येतोय. रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथा जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री आणि शर्वरी लोहकरे सादर करणार आहेत. त्याचे पार्श्वसंगीत मी करत आहे. तेसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. ते नाटकाप्रमाणे नसले आणि केवळ अभिवाचन असले, तरीही त्यात नाट्य आहे. अशाप्रकारे गूढकथा प्रेक्षकांसमोर पहिल्यांदाच येणार आहेत. त्यामुळे संगीतासाठी त्यावर काम करताना खूप मजा आली. त्याशिवाय सोनी मराठीवर ‘सिंगिंग स्टार’ नावाचा रिअॅलिटी शो सुरु होतोय, त्यासाठी मी क्रिएटीव्ह म्युझिक डायरेक्टर म्हणून काम करतोय,” ते सांगतात.

. “त्याशिवाय एक महत्वाचा प्रोजेक्ट मी करतोय. मराठीत  गाजलेल्या ४० ते ५० एकांकिका शूट होणार आहेत. त्यांत मराठीतील आघाडीचे कलाकार काम करणार आहेत.  त्याचेही संगीत मी करणार आहेत. त्याचे काम ऑगस्टपासून सुरु होईल,” ते सांगतात.

Recommended

PeepingMoon Exclusive