जेनेलिया देशमुख आठ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यास झालीय सज्ज

By  
on  

बॉलिवूडमध्ये आपल्या साजि-या-गोजि-या लुकने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री जेनेलिया देशमुख जवळपास आठ वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. 2012 साली अभिनेता रितेश देशमुखसह विवाहबंधनात अडकल्यानंतर मुलं राहिल व रियान यांच्या संगोपनातच जेनेलिया व्यस्त होती. हे दोघंही सेलिब्रिटी कपल नेहमीच कुटुंबाला प्राधान्य देताना पाहायला मिळतात. 

जेनेलियाने या आठ वर्षांच्या काळात निर्माती म्हणून भूमिका बजावली. लय भारी या रितेश देशमुख स्टारर पहिल्या मराठी सिनेमाची ती यशस्वी निर्माती होती. तसंच या सिनेमात तिने पाहुणी कलाकार म्हणून आपल्या नृत्याचा जलवा दाखवला. तसंच पुढच्या माऊली सिनेमात संपूर्ण एका गाण्यातच जेनेलिया रितेशसोबत थिरकली. पण याशिवाय तिने कुठलाच सिनेमा अभिनेत्री म्हणून केला नाही. 


 
एका मुलाखतीत जेनेलिया सांगते, "आता माझी मुलं ब-यापैकी समजूतदार झाली आहेत. त्यामुळे मी आता कामाचा विचार करु शकते. मुलं लहान असताना मला सेटवर जायला अजिबात आवडलं नसतं. तेव्हा माझं सर्व लक्ष कामाएवजी घराकडेच लागलं असतं, पण आता तसं नाही मुलं आता सेटल आहेत. लग्नानंतर मी पूर्णपणे घर व कुटुंबावर लक्ष केंद्रित केलं. पण आता मी काम करण्यास सज्ज आहे."

 

जेनेलिया पुढे सांगते, “मला आता महिला केंद्रित विषयांचं आकर्षण वाटतंय. काहीतरी नवीन करायला मी उत्सुक आहे. दिल्ली क्राईम आणि आर्या पाहून तर मला या दिवसांत महिलांभोंवती फिरणारे कथानक किती मजबूत व अद्भूत असू शकतात याची कल्पना आलीय." 

रितेशसोबत तु पुन्हा आम्हाला दिसशील का, या प्रश्नावर जेनेलिया उत्तरते, का नाही ...एखादा विषय जर फक्त आमच्यासाठीच असेल तर नक्कीच. असं काहीतरी जे फक्त आम्हाला मनापासून करावंसं वाटेल. 
 

Recommended

Loading...
Share