कोणत्याही गॉडफादरविना इरफानने बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिध्द केलं, जाणून घ्या त्याचा प्रवास

By  
on  

झगमगत्या दुनियेच्या बॉलिवूडचं सर्वांनाच नेहमी आकर्षण असतं. या चंदेरी दुनियेचा आपणही एक भाग व्हावा. त्या प्रसिद्ध वलयाने आपल्याभोवतीसुध्दा पिंगा घालावा, असं अभिनेता-अभिनेत्री होण्याचं स्वप्न बाळगणा-या प्रत्येकाला वाटत असतं. पण असं म्हणतात,  कुठल्याही खंबीर आधाराविना किंवा गॉडफादरविना बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणं व स्वत:ची ओळख बनवणं तितकंच कठीण असतं. पण हरहुन्नरी इरफान खानने मात्र फक्त स्वत:च्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान तर निर्माण केलंच पण उतक्यावरच न थांबता त्याने थेट हॉलिवूडपर्यंत मजल मारली. 

इरफानचा हा बॉलिवूड प्रवास वाटतो तितका सोपा कधीच नव्हता.. चला तर एक नजर टाकूयात त्याच्या बॉलिवूड प्रवासावर 

अभिनेता इरफानचा जन्म राजस्थानच्या जयपुरमधील एका पठाण मुस्लिम कुटुंबात ७ जानेवारी १९६७ ला झाला. त्याचे पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान असे आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याच्या वडिलांचा टायरचा उद्योग होता. म्हणावं तशी परिस्थिती ही बेताचीच. 

आपल्याला अभिनय आवडतो हे जाणून घेतल्यावर इरफानने करिअरची सुरुवात करण्याचं ठरवलं. तेव्हा त्याने १९८४ मध्ये दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून म्हणजे एनएसडीमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. एनएसडीमध्ये प्रवेश घेतला खरा. पण त्याच दरम्यान वडिलांचं निधन झाल्याने इरफानला घरुन पैसे मिळणं बंद झालं होतं. घरातून कमावणारं असं कोणीच नव्हतं, त्यामुळे त्याला पैशांची चणचण भासायची. तेव्हा त्याला एनएसडीकडून शिष्यवृत्तीही मिळाली होती. त्याचा त्याला मोठा आधार वाटत असे. 

एनएसडीतून प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर चारचौघांप्रमाणेच इरफानही दिल्लीतून मुंबई या मायानगरीत आपलं नशिब आजमवायला आला. इरफानसाठी सुरुवातीचा काळ फार संघर्षाचा होता. तो छोटीमोठी काम करून आपला उदरनिर्वाह करत होता.पण डोळ्यात काहीतरी करुन दाखवायची चमक मात्र त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. ब-याच प्रयत्नांती इरफानने छोट्या पडद्याच्या दुनियेत प्रवेश केलाच.

मग ‘चाणक्य’, ‘भारत एक खोज’, ‘सारा जहां हमारा’,  ‘श्रीकांत’, ‘चंद्रकांता’, 'स्टार बेस्टसेलर्स' आणि ‘बनेगी अपनी बात’ यांसारख्या मालिकांमधून त्याने भूमिका साकारल्या. 

इरफानने २३ जानेवारी १९९५ मध्ये लेखिका सुतपा सिकंदरशी लग्न केले. एनएसडीमध्ये शिकत असताना इरफान व सुतपाची ओळख झाली व ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.त्यांना दोन मुले असून बाबील आणि अयान अशी त्यांची नावे आहेत.

मोठ्या पडद्यावर त्याचा पदार्पणीय चित्रपट ठरला तो म्हणजे १९८८ साली प्रदर्शित झालेला सलाम 'बॉम्बे'. या चित्रपटाला ऑस्करचे नामांकनही मिळाले होते. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे समीक्षकांनीही कौतुक केले होते.त्यानंतर त्याचे बरेचसे सिनेमे अपयशीसुध्दा ठरले. पण त्याने हार मानली नाही. लंडनच्या एका दिग्दर्शकाने इरफानला पुन्हा संधी देत 'द वॉरिअर' या चित्रपटात मुख्य भूमिका दिली.

२००५ साली प्रदर्शित झालेल्या 'रोग' चित्रपटातील भूमिकेनेही इरफानला ओळख निर्माण करून दिली. त्यानंतर ‘हासिल’ या सिनेमासाठी इरफानला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

 त्यानंतर इरफानने ‘लंचबॉक्स’, ‘गुंडे’, ‘हैदर’, ‘पिकू’ या सिनेमांमधून लक्षवेधी भूमिका साकारल्या. त्याचं त्यासाठी प्रचंड कौतुक झालं.‘ज्युरासिक वर्ल्ड’ यांसारख्या सिनेमाद्वारे त्याने हॉलिवूडपर्यंत त्याने शिखर गाठलं.

इरफान खानला पान सिंग तोमर या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. तसेच २०११ मध्ये भारत सरकारच्या वतीने ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. 

मागच्या वर्षी इरफान खानला न्युरोएन्डोक्राईन कॅन्सरचे निदान झाले होते. मात्र, कॅन्सरवर यशस्वी मात करून तो मायदेशी परतला . 'अग्रेजी मीडियम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षक-समिक्षकांनी त्यांचं खुप कौतुक केलं, पण दुर्दैवाने त्याचा तो अखेरचा सिनेमा ठरला. 

 

 

Recommended

Loading...
Share