By  
on  

Movie Review: लग्नसराईची धामधूम घेऊन आलाय 'वेडिंगचा शिनमा'

दिग्दर्शक:  सलील कुलकर्णी

लेखक : सलील कुलकर्णी

कलाकार: शिवाजी साटम, अलका कुबल,सुनील बर्वे,अश्विनी कळसेकर शिवराज वायचळ, मुक्ता बर्वे, प्रवीण तरडे, ऋचा इनामदार, भाऊ कदम, संकर्षण क-हाडे, त्यागराज खाडिलकर, प्राजक्ता हनमगर,

रेटींग : 3 मून

लग्न म्हटलं की फक्त दोघांचं मिलन नसतं. तर ते दोन कुटुंबांचं मिलन असतं हे आपण पूर्वापार ऐकत आलो आहोत, पण तुम्ही म्हणाल मग यात काय विशेष. लग्न ठरलं की  लगीनघाई, खरेदी, पाहुण्यांची रेलचेल, पत्रिकांचं वाटप हे सर्व आलंच. पण आता ह्यात एक नवीन फॅड सामील झालंय ते म्हणजे प्री-वेडींग शूट. म्हणजेच नवरा-नवरीचं लग्नापूर्वीचं शूटींग. त्यांची प्रेमकहाणी, नातेवाईकांकडून त्यांचं होणारं कोडकौतुक, लाड असं सगळं एका शॉर्ट फिल्मच्या स्वरुपात तयार केलं जातं आणि मग लग्नानंतर एक अविस्मरणीय आठवण म्हणून त्याकडे पाहिलं जातं. अशाच लग्नघरातील धामधूमीवर बेतलेला वेडिंगचा शिनमा घेऊन संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी प्रथम मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत आणि जोडीला तगड्या कलाकारांचा फौजफाटासुध्दा आहे. त्यामुळे धम्माल मनोरंजनाची अस्सल मेजवानी प्रेक्षकांची वाट पाहतेय

कथानक

मुंबईच्या उर्वीला (मुक्ता बर्वे) दिग्दर्शनात मोठं नाव कमावायंचं असतं. त्यासाठी ती प्रचंड मेहनत घेत असते, पण यासोबतच ती आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्री-वेडींग शूट करत पैसेसुध्दा जमवत असते. सासवडमधील मोबाईल शॉपचा मालक प्रकाश शहाणे (शिवराज वायचळ) आणि मुंबईची डॉक्टर परी प्रधान (ऋचा इनामदार) यांचं लग्न ठरतं. ह्या दोघांचं प्री-वेडींग शूट करण्यासाठी उर्वी आणि तिचा डीओपी म्हणजेच कॅमेरामन मदन (भाऊ कदम) सासवडला येतात, ह्या शूटसाठी सतत धडपडतो तो प्रकाशचा जिवलग मित्र मॅक (प्रवीण तरडे) आणि मग त्यानंतर सुरु होते लगीनघाई व परी-प्रकाशचा लग्नापर्यंतचा प्रवास. या प्रवासदरम्यान अनेक हलक्या-फुलक्या आणि मजेशीर घटना आणि प्रसंग नेमके कसे घडतात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहायलाच हवा.

 

दिग्दर्शन

डॉ. सलील कुलकर्णी यांचा हा सिनेमा दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न आहे, असं अजिबातच वाटत नाही. ते जसे आपल्या गाण्यांमध्ये रंग भरतात तसेच त्यांनी ह्या सिनेमातसुध्दा अनेक रंग भरले आहेत. सुरुवातीपासूनच वेडिंगचा शिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरलाय. हलक्या-फुलक्या कथानकाला खुमासदार आणि आजच्या स्टाईलच्या संवांदाची खुसखुशीत फोडणी दिल्याने सिनेमा पाहताना खुप मजा येते. संवांद ही या सिनेमाची एक जमेची बाजूच म्हणता येईल. फक्त मध्यांतरानंतर सिनेमा थोडासा लांबल्यासारखा वाटला आहे. पण ग्रामीण आणि शहरी कुटुंबातील चालीरिती व काळानुरुप त्यांची वैचारिकता थोडक्यात पण प्रभावीपणे मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत.

अभिनय

डॉ. सलील कुलकर्णी यांनी सिनेमातील व्यक्तिरेखांची निवड खुपच अचूक केलीय व ते सिनेमा पाहताना क्षणोक्षणी जाणवतं. प्रकाशचे आई-वडील म्हणजेच शिवाजी साटम आणि अलका कुबल ही जोडी खुपच शोभून दिसतेय तर परीचे डॉक्टर आई-बाबा म्हणून सुनील बर्वे व अश्विनी कळसेकर या जोडीच्या अभिनयाची जुगलबंदीसुध्दा मस्त जमलीय. मुक्ता बर्वे,  संकर्षण क-हाडे, प्रवीण तरडे, भाऊ कदम, प्राजक्ता हनमगर, त्यागराज खाडीलकर या सर्वांनीच आपापल्या भूमिका चोख बजावत सिनेमा खुलवलाय.

सिनेमा का पाहावा?

संपूर्ण कुटुंबासोबत धम्माल एन्जॉय करुन पाहण्यासारखाच वेडिंगचा शिनमा हा सिनेमा आहे. त्यामुळे यंदा लग्नसराईच्या या वातावरणात हा सिनेमा तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत आवर्जून पाहा.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive