By  
on  

Movie Review: बाप-लेकाची हृदयस्पर्शी कहाणी सांगतोय 'बाबा'

प्रमुख कलाकार – दीपक डोब्रियाल, नंदिता पाटकर, आर्यन मेघजी, चित्तरंजन गिरी, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, 

दिग्दर्शन – राज आर गुप्ता

निर्माते – मान्यता दत्त, अशोक सुभेदार

रेटिंग – ३.५ मून 

प्रदर्शनाची तारीख – २ ऑगस्ट २०१९

 

पालकांचं आपल्या मुलावर जीवापाड प्रेम असतं. मुलांची इच्छा पुर्ण करण्यासाठी आई-बाबा काहीही करु शकतात. मुलाच्या अवतीभोवती घुटमळणारं त्याचं एक छोटं विश्व असतं. जेव्हा त्यांच्या या सुखद विश्वात कोणीतरी ढवळाढवळ करुन त्यांचं हे विश्व उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांच्या नात्यांचा कस लागतो. यावेळी आपल्या मुलासाठी ते काय करतात, याची एक भावनाप्रधान गोष्ट 'बाबा'मधून पाहायला मिळते. 

कथानक:
सिनेमाची गोष्ट घडते 1990 सालच्या कोकणातील एका खेडेगावात. जिथे माधव(दिपक डोब्रीयाल), आनंदी(नंदिता पाटकर) आणि त्यांचा छोटा मुलगा शंकर(आर्यन मेघनजी) मजेत जगत असतात. माधव, आनंदी हे दोघे मूकबधिर असतात. शंकरला ऐकता येतं पण बोलता येत नाही. परिस्थिती थोडी हलाखीची असली तरी तिघांही जगण्याचा मनमुराद आनंद घेत असतात. अचानक यांच्या या सुखी भावविश्वात एक वादळ उठतं. शहरातुन आलेले पल्लवी(स्पृहा जोशी) आणि राजन(अभिजीत खांडकेकर) हे तरुण जोडपं माधव आणि आनंदीचा मुलगा शंकर आपला असल्याचा दावा करतात. यामुळे माधव, आनंदी आणि लहानग्या शंकरच्या सुखी जीवनात उलथापालथ होते. पुढे कोर्टात केस उभी राहते आणि त्यानंतर शंकरच्या जन्माचं रहस्य कळतं. कोर्टात केस उभी राहील्यावर माधव आणि आनंदीसमोर एक वेगळाच पेच उभा राहतो. त्यानंतर शंकर आपल्याकडेच राहावा म्हणून माधव-आनंद कशाप्रकारे प्रयत्न करता? ते प्रयत्न करताना त्यांना कोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं? शंकर हा कोणाचा मुलगा आहे, हे कसं सिद्ध होईल? शंकरला हवे असलेले आई-बाबा त्याला मिळतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी 'बाबा' सिनेमा पाहावा लागेल. 

 

दिग्दर्शनः
राज गुप्ता यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा. परंतु त्यांनी अत्यंत सफाईदारपणे दिग्दर्शन केले आहे. प्रमुख व्यक्तिरेखा मूकबधिर असल्या तरी त्यांच्या भावना प्रेक्षकांपर्यंत अचुकपणे पोहोचवण्यास दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. तसेच खेडेगावातलं वातावरणनिर्मिती चांगली दाखवण्यात आली आहे. संगीतकार रोहन रोहन यांनी दिलेलं संगीत आणि गाणी दोन्ही श्रवणीय आणि हृदयस्पर्शी ठरतात.

अभिनय:
अभिनयाच्या बाबतीत सर्वांपेक्षा सरस ठरला आहे तो म्हणजे अभिनेता दिपक डोब्रीयाल. आजवर बाॅलिवुडमध्ये छोट्या छोट्या भुमिकांमधुन सुद्धा अभिनयाची छाप पाडणा-या दिपकला 'बाबा' निमित्ताने पुर्ण लांबीची भुमिका करण्याची संधी मिळाली. दिपकने या संधीचं सोनं केलं आहे. मूकबधिर माधवची भुमिका दिपक अक्षरशः जगला आहे. एकही संवाद न बोलता डोळ्याद्वारे दिपकने प्रकट केलेले हावभाव त्याच्यामधल्या सशक्त अभिनेत्याची जाणीव करुन देतात. दिपकप्रमाणेच छाप पाडली आहे ती बालकलाकार आर्यन मेघनजी. छोट्या शंकरच्या भुमिकेत आर्यन अत्यंत गोड वाटतो. त्याचा निरागसपणा आपल्याला भावतो. नंदिता पाटकरने सुद्धा आनंदी उत्तम साकारली आहे. 'लेथ जोशी'फेम अभिनेते चित्तरंजन गिरी यांनी बोलताना अडखळणारा त्र्यंबक सुद्धा प्रभावी झाला आहे. इतर भुमिकांमध्ये असलेले स्पृहा जोशी, अभिजीत खांडडकेकर, जयवंत वाडकर आदी कलाकारांनी सुद्धा आपापल्या व्यक्तिरेखा चोख बजावल्या आहेत. 

सिनेमा का पाहावा?
सकस कथानक असलेले संवेदनशील सिनेमे पाहायची आवड असेल, तर 'बाबा' तुमच्यासाठी आहे. दिपक डोब्रीयालचा दर्जेदार अभिनय पाहण्यासाठी हा सिनेमा आवर्जुन बघावा.

 

Recommended

PeepingMoon Exclusive