By  
on  

Dhurala Review: राजकारणाच्या जात्यात भरडलेल्या नात्यांचा 'धुरळा'

सध्याच्या घडीला सगळीकडेच चवीने चघळला जाणारा विषय म्हणजे राजकारण. जवळपास प्रत्येक क्षेत्राचा ठाव घेणा-या राजकारणावर आजवर अनेक दर्जेदार सिनेमे बनले आहेत. या यादीत आता धुरळा सिनेमाचंही नाव घ्यावं लागेल. 

कलाकार: अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, अलका कुबल, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक 

दिग्दर्शक : समीर विद्वांस  

कालावधी: 2 तास 49 मिनिट्स 

 

रेटिंग: 3.5 मून

 

 

कथानक : 
आंबेगाव बुद्रुक नावाच्या गावाती  निवडणूक गदारोळ या सिनेमात दिसणार आहे. या गावचे सरपंच निवृत्ती उभे यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा नवनाथ उभे (अंकुश चौधरी) सरपंचपदासाठी निवडणुकीला उभं राहतो. याच दरम्यान नवनाथची सावत्र आई ज्योती उभे (अलका कुबल) याही सरपंचपदाच्या खुर्चीसाठी निवडणूक लढवण्याचं ठरवतात. आमदार (उदय सबनीस) आणि सुनैनाताई (सुलेखा तळवलकर ) यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढवण्यास सज्ज होतात. यासाठी ज्योतीताई सरपंचपदाच्या खुर्चीसाठी बचत गटातील महिलांच्या पाठबळ घेऊन निवडणुकीत उभ्या राहतात. तितक्यात आंबेगाव बुद्रुक गावातील सरपंचपदाची जागा महिलेसाठी राखीव असल्याचा निर्णय कानी येतो. आता सिनेमा अचानक नवं आणि रंजक वळण घेतो. हे वळण काय आहे हे तुम्हाला पडद्यावर पाहायला हवं. 

दिग्दर्शन: 
समीर विद्वांस यांनी हा सिनेमा उत्तम पेलला आहे. गावातील राजकारण, महिलेच्या नावाने असलेल्या सत्ताकारणाचा घेतला जाणारा फायदा. पुरषी महत्वकांक्षेसाठी भरडल्या जाणा-या महिला समीर विद्वांस यांनी उत्तम साकारलं आहेत. मध्यांतरानंतर सिनेमा रेंगाळत असला तरी समीर यांची कथानकाची पकड सैल होत नाही. 

अभिनय: 
या सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखेला आपणच कसे साजेसे आहोत हे कलाकारांनी सिद्ध केलं आहे. लाजवाब अभिनय, उत्तम संवादफेक यामुळे सिनेमाची भट्टी उत्तम जमून आली आहे. कलाकारांच्या तोंडी असलेले तडफदार संवाद सिनेमामध्ये रंगत आणतात. या सिनेमातील  हर्षदा, नवनाथ, हनुमंत, ज्योतीताई, हरिष गाढवे, मोनिका, भाऊज्या या अतरंगी व्यक्तिरेखा कृत्रिम न वाटता आपल्या आसपासची वाटू लागतात. 

सिनेमा का पाहावा? : 
मराठी माणसाला राजकारणाची ओढ आहे. नेमकी हीच गोम हेरून हा सिनेमा आपल्या भावनांना हात घालतो. सिनेमा पाहताना कुठेही कंटाळा येत नाही. निवडणूक कोण जिंकणार हा प्रश्न सतत रुंजी घालत राहतो. त्यामुळे सिनेमातील रंजकता कायम राहते. दिग्दर्शन, अभिनय, संगीत, कथानक या सगळ्याच पातळ्यांवर हा सिनेमा बहुमत मिळवून विजयी ठरतो.

Recommended

PeepingMoon Exclusive