Movie Review : मनोरंजनाच्या अपेक्षा पूर्ण न करणारा 'विकून टाक'

By  
on  

 कलाकार - चंकी पांडे,शिवराज वायचळ,हृषिकेश जोशी, राधा सागर,समीर चौगुले,रोहित माने,ऋजुता देशमुख,वर्षा दांदळे

दिग्दर्शक -समीर पाटील

कालावधी - 2 तास 

 

बॉलिवूडचा विनोदवीर  चंकी पांडे यांचं मराठी सिनेमात पदार्पण म्हणून विकून टाक हा सिनेमा प्रचंड चर्चेत आला. त्याच्या सोबतच आपली मराठमोळी कलाकारांची फौज सज्ज होतीच.पोस्टर बॉईज, पोस्टर गर्ल फेम दिग्दर्शक समीर पाटील यांचा सिनेमा म्हणजे निखळ मनोरंजन म्हणून या सिनेमाकडून प्रेक्षकांना ब-याच अपेक्षा होत्या. एक हलका-फुलका विनोदी सिनेमाची मेजवानी आपल्याला मिळणार हे या सिनेमाचा ट्रेलर पाहून सर्वांनी हेरलं. पण प्रत्यक्षात हा सिनेमा कसा आहे ते जाणून घेऊयात,

कथानक:

 ही गोष्ट आहे, एका तरुणाची. लातूरच्या मुकुंद तोरंबेची (शिवराज वायचळ)याची. त्याला त्याचे घरचे आणि जवळचे मित्र 'मुक्या' म्हणून लाडाने हाक मारतात. मुक्याच्या डोक्यावर कर्ज आहे. ते पण तब्बल 9 लाखांचं. हे कर्ज त्याच्या वडीलांनी घेतलं होतं. पण ते फेडता नआल्याने नैराश्याने आत्महत्या केली. त्यामुळे ते कर्ज आता साहजिकच मुक्याला फेडावं लागणार. म्हणूनच हे कर्ज फेडण्यासाठी मुक्याला दुबईत जाऊन नोकरी करुन कष्ट करुन अधिक पैसे मिळवण भाग आहे. पण आता त्याच्या आईनं त्याचं लग्न ठरवलंय म्हणून त्याला दुबईवरुन गावी येणं भागं आहे. लग्नासाठी मुक्या गावी येतो.  पण अचानक त्यांच्या घरावर जप्ती येते आणि त्याची दुबईची नोकरीसुध्दा कोणत्या तरी कारणास्तव तो गमावून बसतो.या सर्वामुळे त्याचं ठरलेलं लग्नपण मोडतं आणि एक मोठा दु:खाचा डोंगरच त्याच्यावर कोसळतो. मित्र कान्या (रोहित माने) आणि मैत्रीण धनश्री (राधा सागर) यांची मुक्याला मात्र या कठीण प्रसंगात खंबीर साथ लाभली आहे. कान्या हा ऑनलाईन भंगार विकायचं काम करतो.इथूनच मुक्या एक शक्कल लढवतो.  त्यामुळे यातूनच सर्व मामला पुढे घडत जातो. त्यामुळे पळापळी, पोलिसांचा फेरा चुकवणे आणि गावात आलेल्या शेखला तोंड देताना नाकी नऊ येणे असा सर्व सावळा गोंधळ कसा सुरु होतो आणि संपतो हे जाणून घेण्यासाटी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. 

दिग्दर्शनः

दिग्दर्शक चकचकीत आणि मनोरंजनाने भरपूर असलेला सिनेमा  देण्यात कमी पडले आहेत. चंकी पांडेसारख्या भन्नाट अभिनेता असूनही कथेच्या सुमार दर्जामुळे सिनेमाचं गणित जुळलेलं नाही. सिनेमाच्या उत्तरार्धात एक शिकवण द्यायची म्हणून ओढूण ताणून दाकखवली आहे, असे जाणवते. पडद्यावर नेमकं कोणता गोंधळ सुरु आहे, अशा प्रकारचे विचार तो पाहताना येतात,त्यामुळे मांडणीत तो प्रेक्षकांच्या अपेक्षापूर्तीवर अयशस्वी ठरलाय. परंतु सिनेमातील गाणी आणि  संगीत ही साजेशी व  मनोरंजनपर ठरतात. त्यामुळे तो थोडा सुसह्य होतो. 

 


अभिनय:

मुक्या साकारताना अभिनेता शिवराज वायचळने आपले शंभर टक्के दिले आहेत. हे पडद्यावर जाणवतं. त्याने त्याची भूमिका खुलवली आहे. तसंच त्याच्या मित्राची भूमिका साकारणारा रोहित माने हा मोठ्या पडद्यावरचा नवा चेहरासुध्दा लक्षवेधी ठरलाय. तर  समीर चौघुले यांनी सिनेमातसुध्दा आपल्या भूमिकेतून रसिरकांना खळखळून हसवलंय. हृषिकेश जोशी,ऋजुता देशमुख,वर्षा दांदळे यांनीसुध्दा आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. 
 

 

सिनेमा का पाहावा?

जर तुम्ही निखळ मनोरंजनासाठी, भरपूर हसण्यासाठी ह्या सिनेमाचा पर्याय निवडत असाल तर त्याने तुमच्या या अपेक्षा विकून टाक्या आहेत.पण चंकी पांडेचा मराठीतला अभिनय पाहयचा असेल तर हा सिनेमा तुम्ही एकदा पाहू शकता. 

Recommended

Loading...
Share