Movie Review: आजोबांनी दिलेल्या चॅलेंजची गोष्ट ‘बोनस’

By  
on  

कथा : सौरभ भावे 
कालावधी :  २ तास 15 मिनिटं
दिग्दर्शन: सौरभ भावे 
कलाकार : पूजा सावंत, गश्मीर महाजनी, मोहन आगाशे, जयंत वाडकर 
रेटींग : २.५ मून

बोनस म्हटलं की, आपल्याला लगेच दिवाळीत मिळणारा बोनस आठवतो. त्याचा अर्थच मुळी, केलेल्या कामाच्या मोबदल्यात मिळणारी अधिकची गोष्ट म्हणजे बोनस. हा शब्दच मुळात सामान्यांना सुखावून टाकणारा आहे. कारण वर्षभर कष्ट व मेहनतीने काम केल्यानंतर मिऴणा-या तो बोनस रुपी आनंद अवर्णनीय ठरतोय. हाच मध्यवर्ती विषय घेऊन बोनस हा नवाकोरा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. 
गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत ही जोडी या सिनेमाचं प्रमुख आकर्षण. या सिनेमानिमित्ताने ते पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करतायत. तर ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांची विशेष भूमिका म्हणूनसुध्दा या सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली. 

कथानक 
ही गोष्ट आहे आदित्य (गश्मीर महाजनी) नावाच्या तरूणाची. नाशिकच्या एका गर्भ श्रीमंत कुटुंबात लहानाचा मोठा झालेल्या आदित्यला सामान्यांचं जीवन कासं असतं हे माहितच नाही. उच्च शिक्षण अमेरिकेत झालेलं. नाशिकमध्येच कौटुंबिक व्यवसाय आजोबा आणि वडीलांच्या जोडीने सांभाळणारा हा आदित्य. सकाळी उठल्यापासून ते रात्री पर्यंत सतत हाता-बोटाला सेवेसाठी नोकर मंडळी हजर असणारा. 
एकदा कंपनीतील कर्मचाऱ्यांना बोनस देण्यावरून आजोबा (मोहन आगाशे) आणि आदित्यमध्ये खटके उडतात. आदित्यच्या मते, कर्मचा-यांना बोनसची काय गरज, त्यांना दरवर्षी पगारवाढ तर मिळते. मग यातूनच त्याचे आजोबा (मोहन आगाशे) त्याला सामान्य कर्मचा-यासारखं फक्त एक महिना राहून दाखविण्याचं चॅलेंज देतात. मग आदित्य  मोठ्या आत्मविश्वासाने ते स्विकारतो आणि फक्त खिशातील पैशांसह मुंबईला गाठतो. इथे मुंबईतील कोळीवाड्यात सामान्य जीवन जगताना  त्याला ब-याच गोष्टी नव्याने कळतात आणि अशातच त्याच्या या परिस्थितीवर हळूवार मैत्रीची फुंकर घालायला मीनल भेटते (पूजा सावंत). मीनल  आदित्यला त्याच्या प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करायला शिकवते.

आजोबांनी दिलेलं आव्हान पूर्ण करण्याचा आदित्यला यश मिळेल का...सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला आणि ऐषोरामात आयुष्य जगणारा आदित्य तरूणाला सामान्यांचं रोजचं आयुष्य जगण्याची ही संघर्षांची लढाई जिंकू शकेल का ? 
ते पाहण्यासाठी आणि त्याला आयुष्य कसं नव्याने उमगलं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. 

दिग्दर्शन

दिग्दर्शकाने एक साधी सरळ गोष्ट पडद्यावर मांडली आहे. त्याला जे सांगायचंय ते त्यांनी सांगायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. ही प्रेमकथा नाही किंवा नात्यांवर आधारित नाही किंवा कथेत रहस्यही नाही त्यामुळे साधी सरळ गोष्ट पाहणं थोडंसं रटाळ वाटतं. सशक्त कथानक असूनही सिनेमा हा गोष्ट पूर्ण करण्याच्या नादात बराच रेंगाळला आहे. सीन्स बरेच लांबवल्याने सिनेमा खुप धीम्या गतीने पुढे सरकतो. कोळीवाड्यातले सीन्स आणखी खुलवायला वाव होता. संवांद आणि पार्श्वसंगीत साजेसे आहेत.  तुमचं जग, आमचं जग…एलियन आहेस का असे संवाद छान वाटतात. 
तर सिनेमातलं रॅप सॉंग ‘माईक दे’ हे अफलातून आणि साजेसं झालं आहे. 


 

अभिनय

सिनेमाचा नायक साकारणारा गश्मीर महाजनी आणि नायिका पूजा सावंत हे दोघंही यात नॉन ग्लॅमरस लुकमध्ये पाहायाला मिळतात. गश्मीरने आदित्य अगदी हुबेहूब साकारलाय. कोळीवाड्यातली अगदीच मध्यमवर्गीय शिकता शिकता छोटीशी नोकरी करणारी साधी सरळ मीनल पूजाने साकारुन पुन्हा एकदा रसिकांची मनं जिंकली आहेत. 
तर फक्त तीन-चार सीन्समधूनही नेहमीप्रमाणे ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे भाव खाऊन गेले आहेत. जयवंत वाडकर यांनी साकारलेला फ्रान्सिससुध्दा लक्षात राहतो. तर कोळी वाड्यातली गली बॉय गॅंगनेसुध्दा आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे. 

 

सिनेमा का पाहावा?     

जगणं काय असतं आणि ते कोणत्या परिस्थितीत कसं जगायचं हे जाणून घ्यायचं असेल तर हा सिनेमा एकदा पाहायला हरकत नाही
 

Recommended

Loading...
Share