सोनी मराठी वाहिनीवरल्या 'जिगरबाज' या नवीन मालिकेत सत्तेविरुद्ध सत्याचा संघर्ष पाहायला मिळेल. डॉक्टरांचं आयुष्य आणि एका आडगावातल्या हॉस्पिटलची गरज आणि त्यावर होणारा सत्तासंघर्ष यांवर 'जिगरबाज' या मालिकेची गोष्ट आहे.
या मालिकेत प्रतीक्षा लोणकर, अरुण नलावडे, पल्लवी पाटील असे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. यांच्याबरोबरच अमृता पवार, श्रेयस राजे आणि विजय पाटील हे तरुण चेहरेही प्रेक्षकांच्या भेटीला येतील.
प्रतीक्षा लोणकर या हुरहुन्नरी आणि गुणी अभिनेत्री आहेत, या आधीही त्यांनी अनेक मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. त्या गेली कित्येक वर्ष मोनरंजनक्षेत्रात आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. 'जिगरबाज'मध्ये प्रतीक्षा लोणकर मॅडम देशमुख ही व्यक्तिरेखा साकारत आहे. ही व्यक्तिरेखा नकारात्मक आहे. मॅडम देशमुख ही एक कारस्थानी बाई आहे आणि गावातल्या लोक-आधार या एकमेव हॉस्पिटलची मालकीणही आहे. आपल्या स्वार्थसाठी गावातलं एकमेव हॉस्पिटल बंद करून ती जागा तिला कमर्शियल सेंटरसाठी द्यायची आहे.
आधी साध्या सालस अशा भूमिका साकारलेल्या प्रतीक्षा या खलनायकी व्यक्तिरेखेत कशा दिसतील , हे पाहणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.