By  
on  

विजय साळस्करांच्या एन्काउन्टरवर येतेय 'बॉम्बे डे' वेबसिरीज, नितीन चंद्रकांत देसाईंच्या हस्ते मुहूर्त संपन्न

भरत सुनंदा लिखित आणि दिग्दर्शित 'बॉम्बे डे' या वेब सिरिजचा मुहूर्त सोहळा नुकताच नितीन चंद्रकांत देसाई यांच्या उपस्थित 'एन. डी. फिल्म स्टुडिओ' येथे पार पडला. सरकारचे नियम पाळून मुहूर्त करण्यात आला. अजून चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आलेली नाही. सरकारच्या परवानगीनुसार आणि त्यांचे नियम पाळूनच चित्रीकरण केले जाईल.  महाराष्ट्र शासनाने काही नियम आणि अटी पाळून लॉकडाऊन ५.० मध्ये चित्रपट, मालिका आणि वेबसिरीजच्या चित्रीकरणासाठी परवानगी दिली. नियमांचं पालन करत काही ठिकाणी कामाला सुरुवात होत आहे. यात बॉम्बे डे या वेबसीरिजचा मुहूर्त नुकताच पार पडला.

1फाईव्ह फिल्म्स प्रोडक्शन निर्मित 'बॉम्बे डे' ही गुन्हेगारीवर आधारित वेब सिरीज सत्य घटनेपासून प्रेरित आहे. ही गोष्ट आहे मुंबईमधल्या एका मोठ्या अंडरवर्ल्ड डॉनची, ज्याचा एन्काऊंटर विजय साळसकर यांनी केला होता. त्या काळात विजय साळसकर यांनी बऱ्याच कुख्यात गुंडाचे एन्काऊंटर केले होते, पण हा एन्काऊंटर मुंबई मधला सर्वात मोठा एन्काऊंटर ठरला. त्यांना कोणी मदत केली? नक्की कोण कोण यामध्ये सहभागी होते? यात कोणत्या राजकारण्याचा संबंध होता का? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या वेब सिरिजच्या माध्यमातून मिळणार आहेत.

या वेब सिरिज मधील सर्व कलाकारांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. प्रसाद पांचाळ हे कार्यकारी निर्माते आहेत तर धरम सावलानी हे लाईन प्रोड्यूसर आहेत आणि चारू खाबडे या मार्केटिंग आणि इंटिग्रेशनच्या प्रमुख आहेत. 

'बॉम्बे डे' ही वेब सीरिज तुम्हाला गुन्हेगारी कथानक आणि अॅक्शन-पॅक शॉट्सच्या सीन्समुळे कथेशी बांधून ठेवेल यात शंका नाही आणि ही वेब सिरीज नोव्हेंबरमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive