सातारा जिल्ह्यातील कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले यांच्या विरोधात सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यावेळी मुंबईमधील गोरेगाव येथील सेटवरून बिचुकलेंना ताब्यात घेण्यात आलं आहे. एका चेक बाऊंन्स प्रकरणात अभिजीत बिचुकले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी फिर्यादीचं नाव समोर येऊ शकलं नाही.
आरे पोलिसांच्या मदतीने सातारा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अभिजित बिचुकले यांना गोरेगाव फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या सेटवरून अटक केली आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली असून साताऱ्यात भा. दं. वि. कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल होता असून ३५ हजारांचा चेक बाउंस झाल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक यांचे पत्र आणि कोर्टाचे नॉन बेलेबल वॉरंट घेऊन सातारा पोलिसांचे पथक आले होते.
बिचुकले यांचा बिग बॉसच्या घरातील वावर आणि भाषा ही कायमच चर्चेचा विषय बनले होते. अलीकडेच त्यांनी घरात रुपाली भोसलेवर आरोप आणि शिवीगाळ केल्याने त्यांच्यावर भाजपाच्या माजी नगरसेविकेने गुन्हाही दाखल केला होता. आता बिचुकलेंच्या अटकेमुळे त्यांच्या घरातील सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.