By  
on  

'मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमे पाहण्यास प्राधान्य द्यावं'

सुबोध भावे हा सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. सुबोध मराठी सिनेमे असो, मालिका असो वा नाटक आदी विविध माध्यमांमध्ये स्वतःच्या अभिनयाची छाप पाडत आहे. सुबोधचं मराठी भाषेवर असलेलं प्रेम वेळोवेळी प्रेक्षकांना पाहायला मिळतं. 

सुबोध सध्या एका दाक्षिणात्य सिनेमात काम करत आहे. दाक्षिणात्य सिनेमांमध्ये अभिनेत्यांवर त्यांचे चाहते अक्षरशः जीव ओवाळून टाकतात. याविषयी मराठी प्रेक्षकांबद्दल सुबोधने खंत व्यक्त केली. पुणे मिरर या आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुबोध म्हणाला,''जेव्हा एखादा दाक्षिणात्य सिनेमा प्रदर्शित होतो तेव्हा तामिळ प्रेक्षक कुठलाही इतर भाषिक सिनेमा सोडूनआपल्या मातृभाषेतला सिनेमा पाहण्यास प्राधान्य देतात. त्या सिनेमाच्या रिलीजच्या वेळेस फटाके फोडून जल्लोष साजरा केला जातो. मिठाई वाटून तोंड केलं जातं. ज्याप्रमाणे एका देवाला दुधाने अभिषेक करतात त्याप्रमाणे सिनेमाच्या नायकाच्या पोस्टरला दुधाने अंघोळ घातली जाते. एका देवाप्रमाणे तामिळ प्रेक्षक त्यांच्या नायकाला पुजतात.''

सुबोध पुढे म्हणाला,''मी माझ्या मराठी प्रेक्षकांना आम्हाला त्यांनी अशी वागणूक द्यावी. त्यांनी आमच्याही पोस्टरला अभिषेक करावा असं अजिबातच म्हणणार नाही. फक्त त्यांनी आमचं काम पाहावं, मराठी सिनेमे आवर्जून पाहावेत. मराठी सिनेसृष्टीमधे काय चाललंय याचा त्यांनी आढावा घ्यावा, आम्हाला प्रतिक्रिया आणि बदल सुचवावेत, एवढीच माझी माफक अपेक्षा आहे''

सुबोध सध्या 'तुला पाहते रे' मालिकेत काम करत आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तसेच सुबोध लवकरच 'विजेता' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर रंगभूमीवर सध्या गाजत असलेलं 'अश्रूंची झाली फुले' या नाटकात लाल्या ही महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive