‘चैत्र चाहूल’ २०१९ चे सन्मान जाहीर

By  
on  

‘चैत्र चाहूल’ तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘रंगकर्मी’ सन्मान आणि ‘ध्यास’ सन्मान या दोन्ही सन्मानाची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा रंगकर्मी सन्मान २०१९ ज्येष्ठ  दिग्दर्शक अजित भगत आणि ध्यास सन्मान २०१९ मालवणातील बालगंधर्व श्री. ओमप्रकाश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. चैत्र चाहूलतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या या विशेष  सन्मानाचे यंदाचे १४ वे वर्षे आहे. या सन्मानाचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रुपये पंचवीस हजार असा आहे. या सोबत संगीत कलाअकादमी सन्मानित अभिराम भडकमकर, प्रकाश खांडगे, सुनील शानबाग, संध्या पुरेचा व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले प्रा. वामन केंद्रे यांचा गौरव करण्यात येणार आहे.

यंदाच्या चैत्र चाहूल मध्ये ‘अभंग रिपोस्ट’ हा १६ व्या शतकात लिहिलेल्या अभंगांचा पाश्चिमात्य पद्धतीचा फोल्क फ्युजन बँड सादर होणार आहे. आणि त्याचबरोबर मालवणातील ओमप्रकाश चव्हाण आणि त्यांचे दशावतार मंडळ, ‘अभिमन्यू वध’ हे पौराणिक संगीत नाटकातील एक बहारदार प्रवेश सादर करणार आहे. शनिवार दिनांक ६ एप्रिल २०१९ रोजी दुपारी  ३.४५ वाजता  यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा मुंबई येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. मॅजेस्टिक बुक डेपो शिवाजी मंदिर येथे मराठी पुस्तक विकत घ्या आणि कार्यक्रमाला या असे कार्यक्रमाचे संयोजक महेंद्र पवार यांनी कळविले आहे.

ओमप्रकाश चव्हाण  : ‘ध्यास’ सन्मान

मालवण मधील खेडेगावात नाटक हा ध्यास घेऊन गेली ३२ वर्ष  रंगकर्मी  म्हणून काम  करीत आहेत. वडिलांचं अकाली निधन झाल्यानंतर आईने मोलमजुरी करून त्यांना वाढवलं डोक्यावर लाकडाची मोळी आणि कमरेवर पोर घेऊन ही माऊली रोज १२ किलोमीटरची पायपीट करून जंगल, नद्यांमधून वाट काढत मालवणला जायची. १६व्या वर्षी ओमप्रकाश चव्हाणांनी शाळा सोडली. व दशावतारात काम केलं, तर निदान सहा महिने दोन वेळेच्या जेवणाची  भ्रांत मिटेल एवढाच त्यांचा नाटकात काम करण्याचा उद्देश  होता. कालांतराने ते नाटकाच्या  प्रेमात पडले आणि स्त्री  भूमिका साकारू लागले. खेडोपाडी प्रसिद्ध झाले.हा सिलसिला त्यांनी ३२ वर्षे चालू ठेवला आहे. आजपर्यंत त्यांनी जवळपास सात हजार प्रयोगामध्ये काम करून  कलेची  सेवा केली आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल ध्यास सन्मानाने गौरव करण्यात येत आहे.

अजित भगत ‘रंगकर्मी सन्मान’

अजित भगत हा माणुस नाटकाच्या वेडापायी गेली चार दशके रंगभूमीवर कलाकार,दिग्दर्शक म्हणून  वेगवेगळे प्रयोग केले आहेत. कधी आविष्कारच्या माध्यमातून तर कधी सूर प्रवाह संस्थेच्या माध्यमातून वा विविध एकांकिका, राज्य  नाट्यस्पर्धा, इतर विविध स्पर्धा आजही ते तितक्याच  उर्जेने आणि कल्पकतेने रंगभूमीवर नवनवीन अविष्कार करीत आहेत. या सगळ्या  प्रवासात मालिका व सिनेमात ते कधीही आकर्षित झाले नाहीत. मात्र सातत्याने रंगभूमीची सेवा  करीत आले. आणि म्हणूनच या वर्षीचारंगकर्मी सन्मानाने त्यांचा गौरव करण्यात येत आहे.

Recommended

Share