अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा पदार्पणातील सिनेमा म्हणजे ‘बकुळा नामदेव घोटाळे’. या सिनेमाद्वारे सोनालीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आज या सिनेमाला 14 वर्षं पूर्ण होत आहेत. यावेळी कलाकारांनी पोस्ट शेअर करत भावनांना वाट करुन दिली आहे.
आपल्या पोस्टमध्ये सोनाली म्हणजेच बकुळा म्हणते, ‘आज बकुळा नामदेव घोटाळे प्रदर्शित होऊन १४ वर्षं झाली १४ वर्षांचा वनवास असतो म्हणे, पण मला लाभला तुम्हा सगळ्यांचा अमूल्य सहवास… प्रत्यक्ष रूपात अनेक दिग्गज दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्याकडून शिकण्याचा आणि अप्रत्यक्ष रूपात तुम्हा रसिक प्रेक्षकांचं प्रेम आणि आशिर्वाद ज्यामुळेच आजही, इथून पुढेही, तितक्याच किंबहुना त्याहूनही अधिक जोमाने काम करायला मी सज्ज झाले आहे अशीच साथ देत रहा.
तर नामदेव म्हणजेच सिद्धार्थनेही या आठवणींना उजाळा दिला आहे. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, बकुळा नामदेव घोटाळे.... आज "नाम्या" १४ वर्षांचा झाला...छोटीमोठी कामं करता करता.. मुख्य भूमिका मिळालेलं पहिलं काम.. श्रेय अर्थातच केदार सरांनाच... भरत जाधव सरांची साथ आणि आशिर्वाद...
आणि सोनाली बरोबर जोडी... सगळंच कसं जमून आलं... अविनाश खर्शिकर सर आणि विजू मामांना मनापासून miss करतोय... महाराष्ट्रातल्या तमाम मायबाप रसिकांचे मनापासून आभार...’ सिद्धार्थ सोनाली ही जोडी अलीकडेच रिलीज झालेल्या ‘धुरळा’ सिनेमात एकत्र दिसली होती.