दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या बाहुबली चित्रपटाने वेगळा इतिहास निर्माण केला. ‘बाहुबली’ चित्रपटाचे गारूड, त्याचा प्रभाव यामुळे प्रत्येकजण हरखून गेला. निर्मितीसाठीचे उच्च तंत्रज्ञान, व्हीएफएक्सचा वापर, विराट सेटस् आणि त्याला भव्य, उत्तुंग कलात्मक स्वरूप बाहुबलीच्या यशाचे मापदंड ठरले. बाहुबलीच्या या यशाला मानवंदना देत त्याप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी एक आगळी भेट आणली आहे.
आपला मराठीबाणा दाखवत नेहमीच वेगळ्या संकल्पना आणणाऱ्या ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने बाहुबलीचा खास मराठमोळा साज आपल्या प्रेक्षकांसाठी आणला आहे. बाहुबलीच्या यशाचे मापदंड लक्षात घेता त्याच्या तोडीस तोड मराठी चित्रपट आणताना ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने कोणतीही कसर सोडलेली नाही. यासाठी अनेक दिग्गज मान्यवरांचे सहकार्य त्यांना लाभले आहे. आपला मराठमोळा बाणा जपत डोळे दिपवून टाकणाऱ्या ‘बाहुबली’च्या भव्यतेचे स्वप्न प्रत्येकाला घरबसल्या दाखवण्याचा ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीचा प्रयत्न प्रेक्षकांसाठी नक्कीच अनमोल भेट ठरणार आहे.
अभिनेते – दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या मराठमोळया ‘बाहुबली’ चित्रपटाची कलात्मक जबाबदारी सांभाळली असून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, कौशल इनामदार, आदर्श शिंदे, बेला शेंडे यासारखे अनेक नामवंत कलाकार याच्याशी जोडले गेले आहेत.
बाहुबलीच्या मराठी आवृत्तीबद्दल बोलताना ‘शेमारू एंटरटेनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरेन गडा म्हणाले की, “भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील सोनेरी पान म्हणजे बाहुबली हा सिनेमा. या सिनेमाने फक्त कमाईचे नाही तर लोकप्रियतेचेही उच्चांक गाठले. जगभरातील विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा मराठी रसिकांसाठी मराठी रूपात, मराठी आवाजात आपल्या मराठी भाषेच्या लहेजात आणताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे”.
‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीच्या संकल्पनेचे स्वागत करताना भव्यतेसोबत मराठी भाषेचा लहेजा प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणारा असेल असं अभिनेते डॉ. अमोल कोल्हे सांगतात. दिग्दर्शकाच्या नजरेतून काय निर्माण होऊ शकतं हे दाखवून देणारा बाहुबली मराठीत आणत त्याच ताकदीने पोहचवण्याचा ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगत याचा महत्त्वपूर्ण भाग होता आल्याचं समाधान अभिनेते–दिग्दर्शक प्रवीण तरडे व्यक्त करतात. गाजलेल्या कलाकृतीला मराठी मातीचा गंध असणार आहे हे नक्कीच प्रत्येकाला सुखावणार आहे. आतापर्यंत आपण बाहुबलीचं वैभव पाहिलंय आता ते आपल्यास ऐकायला मिळेल, असं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सांगते.
याचे लेखन स्नेहल तरडे यांनी केलं आहे. डॉ.अमोल कोल्हे यांनी बाहुबलीला आवाज दिला असून देवसेनेसाठी सोनाली कुलकर्णीचा आवाज लाभला आहे. मेघना एरंडे-शिवगामी, भल्लाल देव-गश्मीर महाजनी, कटप्पा-उदय सबनीस तर अवंतिका या व्यक्तिरेखेला संस्कृती बालगुडे हिचा आवाज असणार आहे. कौशल इनामदार यांचे संगीत दिग्दर्शन असून गीतलेखन वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे यांनी केले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हृषिकेश रानडे, हंसिका अय्यर, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे.
हा मराठमोळा अंदाज कसा असणार? जाणून घेण्याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागून राहिली आहे.