By  
on  

लाडका 'पांडू' येतोय प्रेक्षकांना हसवायला!

ह्या वर्षाच्या सुरुवातीला 'पांडू' चित्रपटाची घोषणा झाली आणि तेव्हापासून 'पांडू' नेमकं कोण साकारणार, ह्या चर्चांना वेग आला. पण आजच लाँच झालेल्या ह्या चित्रपटाचा टिझरने 'पांडू' आणि 'महादू'ची जोडी प्रेक्षकांसमोर आणलीये. 'भाऊ कदम' आपल्याला 'पांडू' च्या भूमिकेत तर कुशल बद्रिके 'महादू'च्या भूमिकेत दिसणार आहे. ही महाराष्ट्राची लाडकी जोडी मोठा पडदा गाजवण्यासाठी आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झालीये.

महाराष्ट्राला विनोदाची एक मोठी परंपरा लाभलेली आहे. मराठी साहित्य असो की मराठी चित्रपट, मराठी नाटक असो की मराठी लोककला या सर्व कलाप्रकारात विनोदाचं स्थान कायमच वेगळं आणि अढळ असं राहिलेलं आहे. या विनोदी परंपरेला मोठं करण्याचं काम केलंय इथल्या अनेक विनोदवीरांनी. काळू-बाळूपासून ते अशोक सराफ- लक्ष्मीकांत बेर्डेपर्यंत विनोदवीरांच्या अनेक जोड्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. आजच्या घडीला विनोदातील हुकुमी एक्के म्हटलं की सर्वप्रथम नाव येतं ते भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या जोडीचं.

या चित्रपटात 'पांडू' ही मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहेत भाऊ कदम. या भूमिकेबद्दल बोलतांना भाऊ म्हणाले की, " सध्याच्या या तणावाच्या परिस्थितीत प्रेक्षकांना मनोरंजनाच्या दोन घटका देणे आणि त्यांचा ताण हलका करणे यासारखं पुण्याचं काम दुसरं काहीच नाहीये. 'पांडू' प्रेक्षकांची ही गरज शंभर टक्के पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. दिग्दर्शक विजू मानेंसोबत काम करण्याचा अनुभव कायमच मजेशीर राहिलेला आहे आणि सोबतीला कुशल असल्यामुळे ही केमिस्ट्री अजूनच चांगली खुलून आली आहे. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी फार मोठी आणि महत्वाची बाब आहे."

तुफान एनर्जीची देणगी लाभलेला आणि कोणतंही पात्र लिलया साकारणारा कुशल या चित्रपटाबद्दल म्हणतो की,"मी या चित्रपटात महादू हवालदाराची भूमिका साकारतोय. मी आणि भाऊ, आम्ही आजवर विविध माध्यमांतून लोकांचं मनोरंजन केलंय. हीच परंपरा हाही चित्रपट कायम ठेवेल यात शंकाच नाही. गेल्या २१ वर्षात आमच्यातली मैत्री खूप घट्ट विणली गेलीये आणि हीच मैत्री पांडू आणि महादूच्या निमित्ताने प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.  अशात 'पांडू'सारखा चित्रपट प्रेक्षकांना नुसतं हसवणारच नाही तर एक नवी ऊर्जाही देईल हा विश्वास मला आणि आमच्या संपूर्ण टीमला आहे."

गेल्या दोन वर्षांपासून कोविड १९ मुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे आलेलं नैराश्य दूर करण्यासाठी व  प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी झी स्टुडिओजची निर्मिती असलेला आणि विजू माने यांनी दिग्दर्शित केलेला 'पांडू' येत्या ३ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटाला अवधूत गुप्तेंच्या संगीताची साथ लाभली आहे.

मनोरंजनाचं परिपूर्ण पॅकेज असलेला 'पांडू' हा येत्या ३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. तेव्हा लॉकडाऊनचा ताण अनलॉक करण्यासाठी या 'पांडू'ची भेट घ्यायलाच हवी.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive