पत्नीने केलेल्या मारहाणीच्या आरोपांवर अनिकेत विश्वासरावची पहिली प्रतिक्रीया

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात पत्नी स्नेहा विश्वासरावने घरगुती हिंसाचार आणि मारहाणी तक्रार केली आहे. याप्रकरणी पुण्ययातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पत्नी अभिनेत्री स्नेहाने सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण करु नये यासाठी अनिकेत सतत प्रयत्नशील असायचा, नातेवाईकांसमोर तिला सतत अपमानास्पद वागणूक द्यायचा. तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला असे स्नेहाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणात पती अनिकेत विश्वासराव याला सासरे चंद्रकांत आणि सासू अदिती यांनी साथ देण्याचे काम केले आहे. अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाण यांनी डिसेंबर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली होती. 

या संपूर्ण प्रकरणावर प्रथमच अभिनेता अनिकेत विश्वासरावने आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. पत्नीने लावलेल्या या गंभीर आरोपांवर अनिकेतने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. अनिकेतने पत्नीने लावलेले सगळे आरोप फेटाळले आहेत. अनिकेत म्हणाला, 'आम्ही गेले अनेक महिने वेगळे राहत आहोत. ती पुण्यात असते तर मी मुंबईत असतो. आम्ही अजून कायदेशीररित्या वेगळे झालेलो नाही. त्याबद्दल मी आताच काही सांगू शकत नाही. ते सगळं पुढे कळेलच. तिथे माझ्या विरोधात तिने काय केलंय याची मला काहीच कल्पना नाही. ती हे सगळं का करतेय हेदेखील मला कळत नाही. यापुढे मी अजून काही सध्या तरी सांगू शकत नाही'

Recommended

Loading...
Share