'बॉईज २' फेम प्रतिक लाडचे 'टपोऱ्या डोळ्यात' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

'चेतन गरुड प्रॉडक्शन'च्या दिलखेच गाण्यांनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून तरुणाई पासून अबाल वृद्धांपर्यंत या गाण्यांनी ठेका धरायला लावला आहे. 'खंडेराया झाली माझी दैना', 'दिवाना' या गाण्यांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर 'टपोऱ्या डोळ्यात' हे नवे गाणे चेतन गरुड प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. या गाण्याचे विशेष म्हणजे या गाण्यात 'बॉईज २' चित्रपटातील अभिनेता प्रतिक लाड मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रतिकचा धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला या गाण्यातून प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे. 

'टपोऱ्या डोळ्यात' हे एक रोमँटिक सॉंग असून यांत प्रियकर आणि प्रेयसीच्या प्रेमाचे अचूक वर्णन करण्यात आले आहे. आताच्या तरुणाईला भावेल असे हे गाणे असून प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या ओठांवर हे गाणे रुळेल यांत शंकाच नाही.  'चेतन गरुड प्रॉडक्शन'च्या एकामागोमाग एक दिलखेच गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली असून प्रेक्षकांच्या हट्टापायी ते 'टपोऱ्या डोळ्यात' हे गाणे घेऊन आले आहेत. 

 

'चेतन गरुड प्रॉडक्शन' आणि विकास दुबे निर्मित 'टपोऱ्या डोळ्यात' हे गाणे युट्युब चॅनेलवर झळकले असून या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना पाहायला मिळत आहे. 
अभिनेता प्रतिक लाड आणि अभिनेत्री सोनाली दळवी यांची लव्हेबल केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळणार आहे. हे गाणे पंकज दत्तू वारुंगसे यांनी लिहिले असून या गाण्याला संगीतबद्ध करण्याची धुराही त्यांनीच पेलवली आहे. 

तर गायक ऋषिकेश शेलार याने हे गाणे स्वरबद्ध केले आहे. प्रोजेक्ट हेड म्हणून चेतन रविंद्र गरुड यांनी स्वतः बाजू सांभाळली असून चेतन महाजन आणि राहुल जी यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली हे गाणे दिग्दर्शित करण्यात आले आहे.  या गाण्याचे नयनरम्य चित्रीकरण कॅमेरामॅन रुपेश पैकराव याने आपल्या कॅमेरात कैद केले आहे. 

 

प्रतिक लाडचा रोमॅंटिक आणि थोडासा विनोदी अभिनय पाहण्यासाठी 'टपोऱ्या डोळ्यात' या गाण्याला पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. हे गाणे चेतन गरुड प्रॉडक्शन यांच्या युट्युब चॅनेलवर तसेच इतर सोशल पोर्टल्सवर पाहता येणार आहे. फार कमी वेळात या गाण्याला मिळालेल्या विशेष पसंती पाहून हे गाणे नक्कीच रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल यांत शंकाच नाही.

Recommended

Loading...
Share