By  
on  

"परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"…, पाहा ‘सरसेनापती हंबीरराव’चा जबरदस्त ट्रेलर

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या महाराष्ट्राचा महासिनेमाचा जबरदस्त ट्रेलर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी समर्पित करण्यात आला. चित्रपटाच्या घोषणेपासूनच जगभरातील शिवशंभूप्रेमींच्या मनामध्ये या चित्रपटाची उत्कंठा निर्माण झाली होती, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अंगावर रोमांच उभे करणाऱ्या "हंबीर तू..." या गाण्याने ती अजून वाढली तर आता "सरसेनापती हंबीरराव" च्या या जबरदस्त ट्रेलरमुळे ही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. "परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे" असे जबरदस्त संवाद आणि धमाकेदार ऍक्शन सिक्वेन्स असलेल्या या ट्रेलरमध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्यासाठी गाजवलेल्या अतुलनीय शौर्याची झलक पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचा महासिनेमाची ही छोटीसी झलक पाहूनच चित्रपटाची भव्यता लक्षात येते आहे. मराठीत आजपर्यंत पाहायला न मिळालेले अनेक कलाकारांचा समावेश असलेले अंगावर रोमांच उभे करणारे लढाईचे प्रसंग, स्फूर्ती देणारे संवाद आणि महेश लिमये यांचे चित्तथरारक छायांकन यामुळे ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाला 'महाराष्ट्राचा महासिनेमा' का म्हणतात? हे कळते.

या ट्रेलर मधून "मी आता औरंगजेबाला इथेच कुठेतरी सह्याद्रीच्या कुशीत झोपवणार" असे म्हणणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचे आक्रामक रौद्र रूप पाहायला मिळत असून "तुमच्या सारखा मामा प्रत्येकाला मिळो" अशा संवादातून त्यांचे आणि सरसेनापती हंबीरराव यांचे एक हळवे नातेसुद्धा पाहायला मिळणार असल्याचे दिसते. छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका गश्मीर महाजनी साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, या आधी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिकासुद्धा गश्मीर साकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे त्याला दोनही छत्रपतींच्या भूमिकेत बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. "आज आपला भगवा मातीत नाही, गनिमाच्या छातीत रोवायचा" असा हुंकार देणारे सरसेनापती हंबीरराव ही मुख्य भूमिका प्रविण तरडे यांनी साकारली आहे.

 

 

संदीप मोहितेपाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्सच्या शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ हा महाराष्ट्राचा महासिनेमा येत्या काही दिवसात म्हणजेच  27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवशंभूप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive