अशोक सराफ ७५ री विशेष : संतापलेल्या जमावापासून अशोक सराफ यांचा नाना पाटेकरांनी असा वाचवला होता जीव

By  
on  

जीवाला जीव देणारे मित्र असतात, याबद्दलचे अनेक किस्से किंवा सिनेमातले सीन्स पाहून ते आपल्या मनावर पक्कं बिंबवलेलं असतं. पण ख-या आयुष्यातसुध्दा असे मित्र पडद्यामागे मिळायला भाग्य लागतं. पण ह्या पडद्यामागच्या मित्रांच्या मैत्रीचे काही किस्से नुकतेच एका मुलाखतीत उघड झाले. हे जीवाभावाचे दोन मित्र म्हणजे नाना पाटेकर आणि अशोक सराफ.विनोदांचा बादसाह म्हणून अशोक सराफ यांचं मराठी सिनेसृष्टीवर वर्चस्व तर बॉलिवूड व मराठी दोहोंकडे आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनयसम्राट म्हणजे नाना पाटेकर. 

अशोक सराफ यांनी नाना पाटेकर यांच्यासोबत साधारण एक ते दोनच सिनेमात काम केले आहे.  परंतु “हमीदाबाईची कोठी” या नाटकामुळे त्यांच्यातील मैत्रीचे धागे घट्ट झाले. जवळपास आठ महिने त्या दोघांनी हे नाटक रंगभूमीवर सादर केले होते. त्यामुळे दोघांची मैत्री त्या  आठ महिन्यांच्या कालावधीच्या सहवासासात फुलत गेली.

एका प्रयोगादरम्यानचा किस्सा शेअर करत अशोक सराफ यांनी ह्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. एकदा काही कारणास्तव नाटकाचा प्रयोग रद्द झाला होता. प्रेक्षकगृहात प्रेक्षक जमले होते आणि प्रयोग रद्द झाल्याचे समजताच त्यांच्या संतापाला पारा उरला नव्हता. अशोक सराफ तिथे समोरच असल्याने सर्व लोकं त्यांच्या अंगावर धावून गेले. तितक्यात नानांनी चपळाईने  नाट्यगृहाच्या मागच्या बाजूने मार्ग काढत नेले. तसंच रस्ता पार करत अशोक सराफ यांना समोरच असलेल्या सायकल रिक्षात बसवून स्वतः नाना पाटेकर ती सायकल रिक्षा चालवू लागले, अशा प्रकारे चिडलेल्या प्रेक्षकांचा मार खाण्यापासून नानांनी अशोक मामांचा जीव वाचवला. 

तर अशोक सराफ यांच्यासोबतच्या अतूट मैत्रीचे किस्से नानांनीसुध्दा आवर्जून सांगितले, "हमीदाबाईची कोठी नाटक करताना मला ५० रुपये मिळायचे आणि अशोक सराफला २५० रुपये मिळायचे. त्याने मला पैशांची खूप मदत केली. मधल्या वेळात नाटक नसताना आम्ही पत्ते खेळायचो , तर अशोक मुद्दाम ५-१० रुपये हरायचा त्याला माहित होतं मला पैशांची गरज आहे."

अशोक सराफ-नाना पाटेकर यांची ही अतूट मैत्री अशीच अबाधित राहो, हीच पिपींगमून मराठीतर्फे सदिच्छा!

Recommended

Loading...
Share