प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते याने त्याच्या कडक आणि चाबूक गायकीनं सर्वांच्याचं मनात स्थान निर्माण केलं आहे. आज अवधूत प्रसिद्धीच्या, लोकप्रियतेच्या आणि करियरच्या उंच शिखरावर असताना देखील त्याच्यातला नम्रपणा आणि साधेपणा चाहत्यांना भावतो आणि त्याच्या ह्याच साधेपणाचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होतोय.
या व्हिडिओत अवधूत गुप्ते कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात खाली बसून गाणं गाताना दिसत आहे. अवधूतनं स्वतः त्याच्या या गाण्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. त्याचबरोबर एक पोस्ट देखील शेयर केली आहे.
कलर्स मराठी वर सुरु होणाऱ्या 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाच्या ऑडिशनच्या निमित्तानं संपूर्ण टीम कोल्हापूरला गेली होती. कोल्हापुरात गेल्यानंतर अवधूतसह संपूर्ण टीमनं अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यानं देवीच्या गाभाऱ्यात जमिनीवर बसून त्याच्याचं 'एक तारा' या सिनेमातील 'देवा तुझ्या नावाचं रं याड लागलं' हे गाणं गायलं.
या व्हिडीओसोबत त्याने एक पोस्ट देखील शेयर केली आहे. यात अवधूत गुप्तेने म्हटलंय, "कोरोनाच्या दोन वर्षांत कोल्हापूरला येणंच झालं नाही. दोन्ही गणपतींच्या वेळेस अगदी ठरलं आणि शेवटच्या क्षणी कॅन्सल झालं. पण आता "सूर नवा.." च्या ऑडिशनच्या निमित्ताने कोल्हापूरला आलो आणि सर्वात पहिल्यांदा गाठलं ते म्हणजे आई अंबाबाईचं मंदिर!
एरवी मी पहिल्या मजल्यावरील गाभाऱ्याला हजेरी देतो. पण, कसं काय कुणास ठाऊक ह्या वेळेस आई समोरील पहिला मंडप अगदी रिकामा होता! अनिकेत गुरुजी म्हणाले "संधी चांगली आहे... आज ईथेच होऊन जाऊ द्या!" मग पडत्या फळाची आज्ञा मानून मी सुद्धा सुरू झालो!!"
अवधुतच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर त्याचं कौतुक होतंय. तसंच अवधूतच्या चाहत्यांनी या व्हिडीओखाली कमेंट्स मध्ये 'खूप सुंदर', 'आई अंबाबाई तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल', 'ना मोठा स्टेज ना मोठा शो, मंदिरात खाली बसून गाणारा हा पहिला गायक आहे', अश्या अनेक कौतुकाच्या कमेंट्स केल्या आहेत.