"मी कृतघ्न नाही" म्हणत अभिनेते शरद पोंक्षे यांनी आदेश बांदेकरांना दिलं उत्तर!

By  
on  

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण एका वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. सर्वजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट शेअर करत अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला असल्याचे म्हटले गेले होते.

दरम्यान आदेश बांदेकर यांनी शरद पोंक्षे यांचा एक जुना व्हिडीओ शेयर करत काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यावर शरद पोंक्षे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पोंक्षे यांनी एका वृत्तवहिनीला मुलाखत दिली. त्यात पोंक्षे यांनी त्यांची मते मांडली.

या मुलाखतीमध्ये त्यांनी "आदेशचा गैरसमज झाला असणार" असे म्हटले आहे. "मी लिहिलेल्या पुस्तकात कॅन्सरच्या लढ्यात ज्यांनी मला मदत केलीय त्या प्रत्येकाचं ऋण व्यक्त केलं आहे. मी परवा एकनाथ शिंदेंबाबत पोस्ट टाकली होती. त्यांनी मला मदत केल्याची ती पोस्ट पाहून आदेशला वाटलं असावं की मी फक्त एकनाथ शिंदेंचे कौतुक केले, आभार मानले. उद्धव ठाकरेंनी, आदेशने केलेली मदत मी विसरलो असा समज झाला असावा" असे ते म्हणाले.

याबाबत पुढे ते म्हणाले, "तो शिवसेनेमुळे माझा मित्र नाही, तो माझा मित्र कायम आहे, त्यानं पुस्तक वाचलं नाही, त्यामुळे स्वत:चा समज करून घेतला. मित्रा असं नाही. हा सूर्य, हा जयद्रथ.. म्हणत पुस्तकाचा फोटो टाकला. आदेशचा भाऊ मला भेटायला आला त्याचेही आभार मानलेत. त्याने मला मानसिक आधार दिला असंही म्हटलंय. मी कृतघ्न माणूस नाही. मी पोस्ट करताना माझ्या डोक्यात टायमिंग वगैरे नव्हतं. पुस्तकाच्या प्रमोशनची जबाबदारी दिलीय तर ते करतोय. उद्धव ठाकरेंचाही फोटो पुस्तकात आहे. टायमिंग जमल्यामुळे गैरसमज झाला असू शकतो. मी कायम ऋण लक्षात ठेवणारा माणूस आहे." असं शरद पोंक्षे म्हणाले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पोंक्षे यांनी एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो शेयर करत सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यावर शरद पोंक्षे यांच्या भूमिकेत किती द्विधा आहे हे दाखवण्यासाठी आदेश यांनी एका जुन्या मुलाखतीचा विडिओ शेयर करत "हा शरद पोंक्षे तुच ना?" असा थेट सवाल केला.

Recommended

Loading...
Share