राजसाहेबांच्या लोकप्रियतेला टरकणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड झालाय, 'धर्मवीर'चे शब्द बदलले अमेय खोपकर यांचा आरोप

By  
on  

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे सर्वत्र याचीच चर्चा सुरू आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येकजण या प्रकरणावर आपापली मतं मांडताना दिसत आहे. आता मनसेनंही या वादात उडी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासाठी गुरुस्थानी असणाऱ्या आनंद दिघे यांच्या जीवनावर बेतलेल्या 'धर्मवीर' या सिनेमाचा संदर्भ मनसेकडून देण्यात आला. 

मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी नुकतेच ट्विटरवर दोन व्हिडीओ शेअर केले असून व्हिडीओस् मध्ये 'धर्मवीर' या सिनेमातील आनंद दिघे यांच्या आयुष्यातील अखेरचे क्षण दाखवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. 

आनंद दिघे रुग्णालयात असते वेळी जेव्हा राज ठाकरे यांनी आनंद दिघे यांची भेट घेतली असतानाचे हे क्षण आहेत. या सिनेमात आनंद दिघे साकारणाऱ्या प्रसाद ओकनी म्हटलेल्या डायलॉगला शिवसेनेच्या सांगण्यावरून कात्री मारण्यात आल्याचा आरोप खोपकर यांनी केला.

 

 

अमेय खोपकर यांनी शेयर केलेल्या एका व्हिडिओत मध्ये आनंद दिघे (प्रसाद ओक) हे राज ठाकरेंना "हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे. आम्ही आता म्हातारे झालो" असं म्हणताना दिसत आहेत, तर दुसऱ्या व्हिडिओत हा डायलॉग कट करण्यात आला असल्याचे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान त्यांनी हे व्हिडीओ शेयर करत कॅप्शन मध्ये खालील दोन्ही व्हिडीओ काळजीपूर्वक बघा. ‘धर्मवीर’जेव्हा zee5 वर येतो तेव्हा राजसाहेबांबद्दलचं वाक्य का गायब होतं? ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय? राजसाहेबांच्या लोकप्रियतेला टरकणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड झालाय.' असं म्हटलं आहे.

Recommended

Loading...
Share