नशीबवान आहात! तुम्हाला राखेतनं झेप घ्यायची आहे..उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर किरण मानेंची प्रतिक्रिया!

By  
on  

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनामान्यानंतर अनेक कलाकार आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

अभिनेते किरण माने यांनीदेखील या प्रसंगावर फेसबुक पोस्ट शेयर करत त्यांची भावना व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांचा एक फोटो शेअर करत किरण माने म्हणाले...

"…उद्धवजी, एकच शब्द : ‘ग्रेसफुल’! सत्यघटना सांगतो. सातार्‍याजवळ खिंडवाडी नावाचं एक छोटं गांव आहे. तिथं एका मित्राकडं काल मी जेवायला गेलो होतो. एकतर गांव खूप छोटं. त्यात गांवापासून लांब शेतात एकाकी असलेलं घर. गावाकडची साधी मानसं, राजकारणाशी-कुठल्या पक्षाशी काहीही संबंध नाही. पोटापुरतं कमवायचं आणि दुनियादारीशी संबंध नाही. बऱ्याच दिवसानंतर जमीनीवर मांडी घालून जेवायला बसलो आणि ही बातमी दिसली…"

पुढे किरण माने म्हणाले, ",कोणाचा विश्वास बसणार नाही, पण तुम्ही राजीनामा दिला हे कळल्यावर, त्या घरातला एकेक मानूस हळहळला. काही लोकांच्या डोळ्यांत पानी आलेलं मी काल माझ्या डोळ्यांनी बघितलं. घरातल्या लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य होतं 'चांगला मानूस' होता!"

पुढे किरण माने यांनी उद्धव यांच्या राजीनामा देण्याने त्यांना का आनंद झाला हे सांगताना ते म्हणाले, "मला आनंद याचा झालाय की तुम्ही आता खूप भाग्यवान आहात. सहजासहजी कोणाला मिळणार नाही, आज एका नेत्याकडे नसेल अशी एक गोष्ट तुमच्याकडे आहे… कोणती? आता तुमच्याजवळ जे उरलेत ते अत्यंत नि:स्वार्थी, निष्ठावान, शुद्ध - स्वच्छ मनाचे कार्यकर्ते आहेत. भले संख्या कमी असेल, पण जे आहेत ते मनाच्या तळापासून 'तुमचे' आहेत. जितक्या नि:स्वार्थीपणे तुमच्यासोबत रश्मिजी आणि आदित्य आहेत, तितक्याच नितळ भावनेनं आता उरलेले सगळे शिवसैनिक देखील तुमचे आहेत. गाळ बाजूला गेला, आता शंभर टक्के 'प्यूअर' असलेला एकेक माणूस तुमच्यासोबत आहे. नशीबवान आहात! तुम्हाला राखेतनं झेप घ्यायची आहे.. शून्यातनं विश्व उभं करायचंय.. हे लिहिणारा मी ना शिवसैनिक, ना राजकारणी. तुम्ही आयुष्यात कोणतीही मदत मला केलेली नाही आणि मी ती अपेक्षा पण कधी ठेवली नाही. तरीही मला तुमच्याबद्दल आज हे वाटतंय, ही तुमची 'ॲचिव्हमेन्ट' आहे!"

दरम्यान त्यांच्या या पोस्टवर नेटकर्यांनी देखील कमेंट्स करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Recommended

Loading...
Share