'तमाशा लाईव्ह' चित्रपटातील गाण्यांना संगीतप्रेमी चांगलाच प्रतिसाद देत आहेत. आता नुकतेच शेफाली अर्थात सोनाली कुलकर्णी हिचे 'कडक लक्ष्मी' हे गाणे सोशल मीडियावर झळकले असून या गाण्याला क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे. तर या गाण्याला पंकज पडघन यांनी संगीत दिले असून विशेष बाब म्हणजे हे गाणे सोनाली कुलकर्णी हिनेच गायले आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे. यात सोनाली कुलकर्णी आक्रमक स्वरूपात तिची व्यथा व्यक्त करत आहे. गाण्याचे नाव 'कडक लक्ष्मी' असून नावाप्रमणेच या गाण्याचे बोल आहेत.
'कडक लक्ष्मी' गाण्याबद्दल गीतकार क्षितीज पटवर्धन म्हणतात, " हे गाणे मी शब्दबद्ध केले असले तरी सोनालीने अगदी उत्तमरित्या ते सादर केले आहे. मुळात हे गाणे ती स्वतः गायली आहे. त्यामुळे या गाण्यातील भावना या तिच्या चेहऱ्यावर आपसुकच दिसून येत आहेत.’’
' प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " संगीतातून कथा सांगणारा ‘तमाशा लाईव्ह’ हा पहिला मराठी चित्रपट आहे. संजय जाधव यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून एक आगळावेगळा प्रयोग सादर केला आहे. या गाण्यांना मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून संजय जाधव यांचा हा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल याची मला खात्री आहे. "
प्लॅनेट मराठी, माऊली प्रॉडक्शन, एटीएट पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा तोलमारे, समीर केळकर, अजय उपर्वात सहनिर्मित या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या १५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.