'पट्या मी तुला खूप मिस करणार यार', प्रशांत दामले झाले भावूक

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने ६४ व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजलं. मराठीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर द्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनीसुध्दा आपल्या लाडक्या मित्रासाठी खास भावूक पोस्ट शेयर केली आहे. 

प्रशांत दामले फेसबुकवर पोस्ट शेयर करत लिहतात, "पट्या... प्रदीप पटवर्धन...मी आणि प्रदीप.. आमची जोडी होती.. महाराष्ट्राची लोकधारा, मोरूची मावशी, चल काहीतरीच काय, वेगळवेगळे चित्रपट, मालिका आम्ही एकत्र केल्या...सिद्धार्थ कॉलेज ची 5 वर्ष  (1978 ते 1982) प्रायोगिक रंगभूमी आणि 1 जानेवारी 1985 ते आजपर्यंत व्यावसायिक रंगभूमी अशी आमची एकूण 44 वर्षांची दोस्ती. ही घानिष्ठ मैत्री आता एक तर्फीच चालु राहणार. मोरूची मावशी ह्या नाटकाचे आमचे तुफानी दौरे व्हायचे. विजय चव्हाण  विजय साळवी, टाकळे, बिवलकर, वासंती निमकर, पट्या, मी असे विविध वयोगटातली नट मंडळी होती. त्यामुळे नुसता धुडगूस असायचा.  नृत्यात त्याचा हात कोणीही धरू शकत नव्हता. खुप आठवणी आहेत.
पण आत्ता ह्या क्षणाला शब्दात मांडण अत्यंत कठीण आहे.
पट्या मी तुला खुप मिस करणार आहे यार"

 

 

प्रदीप आणि प्रशांत यांची मोरूची मावशी नाटकातील जोडी सुपरहिट ठरली होती. या नाटकातला एक जुना व्हिडिओ सुद्धा सध्या बराच प्रसिद्ध होत आहे. या व्यतिरिक्त सुद्धा प्रदीप यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. महाराष्ट्राची लोकधारा, चल काहीतरीच काय, एक फुल चार हाफ, चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, नवरा माझा नवसाचा अशा अनेक नाटक आणि सिनेमांत त्यांनी केलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत.

Recommended

Loading...
Share