जगण्यावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट ; बहुप्रतिक्षित 'गोदावरीची'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

By  
on  

जिओ स्टुडिओ प्रस्तुत, ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित ‘गोदावरी’ हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशीने प्रमुख भूमिका साकारली असून यात विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे आणि प्रियदर्शन जाधव असे असे अनेक कलाकार यात आहेत 

अभिनेता जितेंद्र जोशीने त्याच्या सोशल मीडियावर बहुचर्चित ‘गोदावरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. गोदावरी नदीच्या काठावर चित्रित करण्यात आलेल्या या विशेष व्हिडिओमध्ये जितेंद्र जोशीने त्याचा दिवंगत मित्र आणि  प्रख्यात दिग्दर्शक निशिकांत कामत यांना त्यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त विशेष श्रद्धांजली वाहिली आहे.

जितेंद्र जोशीने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं आहे की, “जेव्हा निशिकांत आम्हाला सोडून गेला तेव्हा खूप एकटं पडल्यासारखं वाटत होतं. मी त्याला प्रत्येक कथेत शोधत होतो. त्याच्या नसण्यावर प्रश्नचिन्ह उभे करत होतो, त्याचं असणं माझ्या अवतीभोवती हवं होतं आणि तेच शोधत असताना मी गोदावरीशी बोलू लागलो आणि तिथेच मला निशिकांत सापडला. आजही मला त्याची आठवण येत आहे.” गोदावरी ही निशिकांतची कथा आहे. एक असा माणूस जो आपल्या कुटुंबापासून दूर भटकला आहे, अस्तित्वहीन आयुष्य जगतो आहे आणि या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं त्याला गोदावरी नदीजवळ मिळतात ज्याचा त्याने इतकी वर्षं तिरस्कार केला." 

दरम्यान आत्तापर्यंत गोदावरीला अनेक भारतीय तसेच जागतिक पुरस्करांनी गौरवण्यात आलं असून या चित्रपटाची २०२१ च्या भारतातील सर्वोत्तम १० चित्रपटांमध्ये निवड करण्यात आली. तसंच IFFI २०२१ मध्ये जितेंद्र जोशीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सिल्व्हर पीकॉक पुरस्कार देखील जिंकला आहे, तर निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये, निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आणि शमीन कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर एवी प्रफुल्ल चंद्रा यांना विशेष ज्युरीचा सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार मिळाला.

Recommended

Loading...
Share