हर हर महादेव वाद : दिग्दर्शक अभिजीत देशपांडे म्हणतात, " सेन्सॉर बोर्डाकडे सर्व ऐतिहासिक संदर्भाचे पुरावे...."

By  
on  

अभिजीत देशपांडे दिगदर्शित आणि सुबोध भावे, शरद केळकर अभिनीत भव्य ऐतिहासिक सिनेमा हर हर महादेव निमित्ताने सध्या महाराष्ट्रभर नवा वाद सुरु झाला आहे. काल या सिनेमाचा शो ठाण्यातील व्हिवीयाना मॉलमध्ये सुरु असताना. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह सिनेमागृहात घुसले व हा शो बंद पाडला. इतकंच नव्हे तर तिथे उपस्थित प्रेक्षकांना मारहाणही केली. या वादात मनसेनेही उडी घेत जितेंद्र आव्हाडांविरोधात शाब्दिक फटकेबाजी केली. यानंतर आज 100 आव्हाड समर्थकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण चिघळल्यामुळे हर हर महादेवचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी नुकतीचप त्रकार परिषद घेत महत्त्वाचे खुलासे केले आहेत. 

पत्रकारांशी संवाद साधताना अभिजीत देशपांडे म्हणाले, “आम्ही कोणताही चुकीचा इतिहास चित्रपटात दाखवलेला नाही. ‘हर हर महादेव’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डकडून प्रमाणपत्र मिळालं आहे. या चित्रपटात दाखवलेल्या सगळ्या ऐतिहासिक संदर्भाचे पुरावे, त्यासंदर्भातील दस्ताऐवज आम्ही ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’कडे पुरविले आहेत. ‘सीबीएफसी’च्या पॅनेलवर अनेक तज्ज्ञ, इतिहासकारही असतात. हे सगळं तपासूनच चित्रपटाला मान्यता दिली गेली आहे. कोणत्याही चित्रपटाला अशीच मान्यता मिळत नाही. त्यामुळे चित्रपट न पाहता त्यावर टीका करणे चुकीचे आहे”.

देशपांडे प्रेक्षकांना मारहाण करण्याचा निषेध करत म्हणतात,  “चित्रपट पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन मारहाण करण्यात आली. त्यांचे कपडे फाडले गेले. अर्वाच्य भाषेत त्यांना शिवीगाळ करण्यात आली. हा घडलेला प्रकार अत्यंत लांच्छनास्पद आहे. एकीकडे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वत:ला भक्त म्हणवतो. तर दुसरीकडे त्यांचेच विचार समजून न घेता शिवीगाळ, मारहाण करत असू तर आपल्याला हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवायचा आहे”,

 

 

 

 

‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर २५ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला होता.

Recommended

Loading...
Share