सुप्रित निकम दिसणार वेगळ्या अंदाजात, यासाठी बदलला लूक

By  
on  

लहानपणापासूनच अभिनयाची ओढ... हौशी कलाकार म्हणून रंगभूमीवर सातवी-आठवीतच पडलं यशस्वी पाऊल... छोट्या-मोठ्या भूमिकांच्या साथीनं अभिनयाची आवड केवळ जपलीच नाही तर ही मनोरंजन क्षेत्राची खिंड लढवणं वाटतं तितकं सोप्प नाही हे ही जाणलं. अथक प्रयत्नांती मनाजोगतं काम मिळू लागलं आणि काल ज्या लोकांनी उपदेशाचे डोस पाजले त्यांना आज मार्गदर्शन करण्याचं प्रभुत्व सुद्धा लाभलं. एखाद्या चित्रपटाला शोभेल असंच कथानक आहे ना.. पण ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारलेली आहे असं म्हटलं तर.. ही गोष्ट आहे सुप्रित निकम या तरुण होतकरू कलाकाराची आणि त्याच्या करिअरची. सुप्रित निकम अनेक मालिका-नाटक आणि चित्रपटांतून आपल्यासमोर आलेला यंग, डॅशिंग ऍण्ड चिअरफूल व्यक्तिमत्त्व. लवकरच सुप्रित लायन क्राऊन एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत आणि सौरभ भावे दिग्दर्शित 'बोनस' या आगामी मराठी चित्रपटातून आपल्या भेटीस येणार असून यात तुम्ही त्याचं एक नवं व्हर्जन पाहू शकणार आहात.
''अभिनय हा कायिक-वाचिक असावा लागतो. दोन्ही पातळींवर तुम्हाला समतोल राखावा लागत असल्याने मला अनेकांनी हा नाद सोड असा सल्ला दिला. त्याला कारण ही तसंच होतं म्हणा. या क्षेत्रात उत्तम अभिनयाची जाण असण्यासोबतच तुमचं दिसणंही ग्राह्य धरलं जातं. ११० किलो वजन असणारा मी कुठल्याही अँगलने मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करण्यास लायक नाही हे सांगणार्रे खूप जण होती पण उपजतच असलेलं अभिनयाचं ज्ञान त्यावेळी कामी आलं. अभिनय, संवादफेक आणि आकलनशक्ती यांच्या जोडीने मी मनोरंजन क्षेत्राचा दरवाजा ठोठावला आणि या क्षेत्रानं आणि माझ्या रसिक-मायबाप प्रेक्षकांनी मला स्वीकारलं.'' असं सुप्रित आपल्या 'बोनस' चित्रपटाच्यानिमित्ताने बोलताना सांगतो. 'बोनस' या चित्रपटात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून त्यात त्याने 'केळ्या' नावाचं मजेशीर पात्र रंगवलं आहे. शिवाय त्याचे अनेक आगामी प्रोजेक्ट्स लाइन्डअप असून 'कटिबंध' मध्ये संत नरहरी सोनार यांच्या मोठ्या मुलाची 'मालू' ,  'विठ्ठला तूच' या आगामी चित्रपटातील मुख्य खलनायक, अलीकडेच प्रदर्शित झालेल्या H2O या मराठी चित्रपटातील खलनायकाची भूमिका अशा एक ना अनेक भूमिका तो सक्षमपणे साकारतोय. विशेष म्हणजे  एका कन्नड चित्रपटामध्येही सुप्रितची वर्णी लागलीये.
मूळचा सांगलीचा असणारा सुप्रित जवळपास १२ वर्ष नाटकांत काम करत होता. त्याचं स्वप्नं होतं मुंबापुरीत जायचंच आणि आपलं ध्येय पूर्ण करायचं. त्याला त्याच्या मनाची द्विधा अवस्था स्वस्थ बसू देत नव्हती पण एक अनामिक भीतीही दडली होती. अपयश.. पण मग त्याने मनाशी पक्कं ठरवलं, म्हणतात ना.. 'अपयश ही यशाची पहिली पायरी आहे' काहीही होवो पण प्रयत्न कमी पडता काम नये हा एकमेव गुरुमंत्र अवलंबत सुप्रितने आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर ११० किलो  चॅलेंज स्वीकारलं आणि सकस डाएट, योगा आणि किमान १२-१५ किलोमीटर चालणं यांच्या साथीनं यश गाठलंच. ११० वरून ७२ किलोंपर्यंतचा झालेला कष्टप्रद प्रवास सुप्रित कधीच विसरू शकत नाही. हेच त्याच्या यशाचे गमक आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समधून तो रसिक-प्रेक्षकांची मनं जिंकेल यात काही शंका नाही.

Recommended

Loading...
Share