By  
on  

‘श्री गुरुदेव दत्त’ लवकरच ‘स्टार प्रवाह’वर

मराठी असो वा हिंदी सध्या प्रत्येक वाहिनीवर पौराणिक मालिकांचा ट्रेण्ड पाहायला मिळतोय. ‘विठुमाऊली’ मालिकेला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादानंतर ‘स्टार प्रवाह’ वाहिनी आणखी एक पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. दत्तगुरुंचा महिमा सांगणाऱ्या या मालिकेचं नाव ‘श्री गुरुदेव दत्त’ असं असेल. १७ जूनपासून सायंकाळी साडेसात वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. दत्तगुरुंचा जन्म कसा झाला? बालपणीच्या त्यांच्या अगाध लीला आणि माता अनसूयासोबतचं त्यांचं नातं मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे. श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती,स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसंच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असं पुराणांमध्ये दत्तगुरुंचं वर्णन केलं जातं. निर्गुण आणि निराकार अशाब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. दत्तगुरुंच्या अवताराची ही गोष्ट मालिकेतून पाहायला मिळणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक सुखद अनुभव नक्कीच असेल.

या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘इतक्या महान अवताराची कथा सांगताना गर्व, अभिमान आणि आनंद वाटतोय. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा मिळून एक अवतार जन्मला ते म्हणजे दत्तगुरु. दत्तगुरुंच्या अवताराची जन्मापासूनची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळले. अत्री ऋषी आणि माता अनसूयेच्या पोटी जन्माला येण्यापासून ते अगदी आजही त्यांच्या महात्म्याची वेळोवेळी प्रचिती देणारी अद्भुत कथा सादर करण्याचा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा प्रयत्न असेल. अध्यात्म, सत्य आणि अप्रतिम व्हिज्युअल इफेक्टस याची उत्तम सांगड या मालिकेत दिसेल.

सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक दिपक देऊळकर यांनी या मालिकेची निर्मिती केली असून दिग्दर्शक अनिल राऊत आणि स्वत: दिपक देऊळकर या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेच्या लेखनाची जबाबदारी असेल स्वामी बाळ यांच्याकडे. पौराणिक काळ जिवंत करणारा भव्यदिव्य सेट या मालिकेचं आणखी एक वैशिष्टय म्हणता येईल.

https://twitter.com/StarPravah/status/1135388149562130432

‘स्टार प्रवाहवर’ सायंकाळी ७ वाजता प्रक्षेपित होणारी ‘विठुमाऊली’ मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. त्याचप्रमाणे १७ जूनपासून सायंकाळी ७.३० वाजता सुरु होणारी ‘श्री गुरुदेव दत्त’ ही मालिकाही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. भक्तीरसाने भारलेला असा हा एक तास दररोज ‘स्टार प्रवाह’ वाहिनी आपल्या भेटीला घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका ‘श्री गुरुदेव दत्त’ ही नवी मालिका.

Recommended

PeepingMoon Exclusive