By  
on  

बिग बॉस मराठी 2: पराग आणि रुपालीमध्ये बहरतंय प्रेमाचं नातं?

‘बिग बॉस’ हा कार्यक्रम अनेक कारणांमुळे कायम चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सिझनमध्ये राजेश श्रृंगारपुरे आणि रेशम टिपणीस या दोघांमधलं मैत्रीपलीकडचं नातं खूप चर्चेत होतं. त्यानंतर आता दुसऱ्या सिझनमध्येही एक प्रेमकहाणी नुकतीच उमलताना दिसतेय.

‘बिग बॉस मराठी 2’च्या घरात म्हणजे पराग कान्हेरे आणि रुपाली भोसले हे दोघं नव्या सिजनमधले लव्हबर्ड्स म्हणून ओळखले जात आहेत. रूपाली आणि पराग यांचा घरातला वावर पाहून सदस्यांनाही यांच्यात काहीतरी शिजत असल्याची चुणूक लागली आहे.

सिझनच्या दुसऱ्या दिवसापासूनच या दोघांची चांगली मैत्री झाली. परागनं गार्डनमध्ये बसून गप्पा मारताना त्याच्या भूतकाळाविषयी, जोडीदारासोबत घटस्फोटाविषयी सांगितलं. त्यानंतर रुपाली नेलपॉलिश लावत गप्पा मारत असताना परागनं ती बाटली हातात घेत तिच्या पायांना नेलपॉलिश लावून दिलं.

 दोघंही बिग बॉसच्या घरात एकमेकांना सांभाळून घेताना आणि सावरताना दिसत आहेत. घरात रंगणाऱ्या टास्कमध्येही पराग आणि रुपालीची मैत्री दिसून येते. नॉमिनेशन टास्क सुरू होण्यापूर्वी परागला रुपाली म्हणाली, ‘तू माझ्यावर प्रेम करू शकतोस किंवा माझा तिरस्कार करू शकतोस. पण मला टाळू शकत नाहीस.’ यावर परागने उत्तर दिलं, ‘मी तुझा तिरस्कार कधीच करू शकत नाही. पण तुझ्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न मात्र मी नक्कीच करू शकतो.’ अशा वाक्यांद्वारे दोघांनी एकमेकांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या.

इतकंच नव्हे तर रुपालीला नॉमिनेशन टास्कपासून वाचवण्यासाठी पराग वैशाली माडेला विनंती करताना दिसला होता. नॉमिनेशन टास्कमध्ये जर त्याने नेहाला वाचवलं तर वैशालीनं रुपालीला वाचवायचं असा करार त्याने वैशालीसोबत केला. आता नॉमिनेशन टास्कमध्ये काय होणार आणि सर्वात पहिला कोणता स्पर्धक घराबाहेर पडणार हे 'बिग बॉस मराठी 2'च्या या आठवड्यात पाहणं कुतुहलाचं ठरणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive