By  
on  

'वेलकम होम' हा सिनेमा माणूस म्हणून प्रगल्भ करणारा एक अनुभव: मृणाल कुलकर्णी

सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांचा 'वेलकम होम' हा सिनेमा १४ जूनला प्रदर्शित होत आहे. या सिनेमाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे.या निमित्ताने या सिनेमात प्रमुख भूमिका केलेल्या मृणाल कुलकर्णी यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्यात आला. 

'वेलकम होम' हा सिनेमा का करावासा वाटला?

- सुमित्रा मावशींनी आठ दहा वर्षांपूर्वी मला ही कथा ऐकवली होती. त्यांची इच्छा होती, की मी या चित्रपटात काम करावं. माझ्यासाठी अत्यंत चांगली भूमिका आहे, असं त्यांना वाटत होतं. सुमित्रा मावशींबरोबर काम करण्याची खूप मनापासून इच्छा होती. मी,माझ्यासाठी संहिता तुमच्याकडे का नाहीये, कथा का सुचत नाही, अशी मी प्रेमळ तक्रार त्यांच्याकडे अनेकदा करत असे. प्रत्येकवेळी मला त्या याच कथेची आठवण करून द्यायच्या. त्यामुळे त्यांच्या मनात या कथेसाठी माझाच विचार होता. पण काही वेळा योग जुळून यावे लागतात. तसा हा योग जुळून आला आणि अप्रतिम चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली. सुमित्रा मावशी आणि सुनील सुकथनकर ही खूप वेगळी जोडी आहे. सुमित्रा मावशी ज्या पद्धतीनं विषयाचा विचार करतात आणि लेखनात उतरवतात. त्यासाठी त्यांना खरोखरच मनापासून सलाम करावासा वाटतो. मी त्यांचे सर्व चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिलेले आहेत. एखादा विषय संवेदनशीलतेनं कसा मांडावा हे खरोखरच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. एक अभिनेत्री आणि दिग्दर्शिका म्हणूनही त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप काही आहे. म्हणूनच हा 'वेलकम होम'चा संपूर्ण प्रवास माझ्यासाठी खास आहे.

आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या भूमिका आणि ही भूमिका यात काय आव्हान वाटलं?

- मी आतापर्यंत खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्या. अलीकडे काही हलकेफुलके चित्रपटही केले. पण माझा मूळ पिंड संवेदनशील विषयांचा आहे. त्यामुळेच 'वेलकम होम'ची कथा मला भावली. मला वाटतं, प्रत्येक स्त्रीने हा सिनेमा बघायलाच हवा. केवळ स्त्रीनेच नाही, तर पुरुषांनीही.. जेव्हा आपण स्त्री पुरुष समानता या विषयावर अनेक प्रकारे, अनेक ठिकाणी बोलतो, त्यावेळी आपण या विषयात किती मागे आहोत, त्याची जाणीव या सिनेमात होत राहते. सुमित्रा मावशींचे सिनेमे कधीच एकांगी नसतात. त्याला नेहमी अनेक पदर असतात. प्रत्येक व्यक्तिरेखेचचा या विषयाबाबत असलेला विचार आपल्याला अनुभवायला मिळतो. प्रत्येक माणसाला लागू होईल, प्रत्येकाला आपलं प्रतिबिंब दिसेल असा हा सिनेमा आहे. म्हणून माझ्यासाठी हा सिनेमा, ही भूमिका महत्त्वाची आहे. फार कमी वेळा इतकी खरी भूमिका, व्यक्तिरेखा करायला मिळते. ही भूमिका करायला मिळाली, मला डोळ्यासमोर ठेवून लिहिली गेली याचा मला आनंद वाटतो. 

सिनेमाची कथा आणि आजच्या स्त्रीचं जगणं या विषयी काय सांगाल?जसा तुम्ही या सिनेमात विचार केला आहे तसा विचार इतर स्त्रिया करतात?

- आज आपण म्हणतो, की स्त्री स्वतंत्र झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली. सगळं खरं आहे. पण सुशिक्षित, कमावत्या बायकांना तरी याचा अर्थ कळला आहे का, त्यांच्या घरातल्या पुरुषांना त्याचा अर्थ कळला आहे का, हा खूप गंभीर प्रश्न आहे. माझ्या आजुबाजूच्या प्रत्येक स्तरातल्या स्त्रिया काम करताना बघते, घर सांभाळताना बघते, घर उभं करताना बघते, मुलांवर संस्कार करताना बघते, कुटुंबाला पुढे घेऊन जाताना बघते. तेव्हा मला वाटतं, या स्त्रीचं तिच्या घरातलं स्थान काय असेल, समानता तर पुढचा मुद्दा, किमान मुलभूत हक्क मिळत असेल का, तिची मतं मांडण्याचं, मनाप्रमाणे वागण्याचं, बोलण्याचं, राहण्याचं स्वातंत्र्य मिळत असेल का, हा सगळा विचार स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत जोडीनं करण्याचा आहे. जोडीनं जगायचं असतं, त्याला सहजीवन म्हणतात. त्यात एकमेकांचं स्वातंत्र्य, निर्बंध हे दोघांनी मिळून ठरवायला हवेत. एकमेकांविषयी विश्वास पाहिजे. असं सहजीवन आपल्याला किती ठिकाणी दिसतं? कधीकधी अशिक्षित लोकांमध्ये दिसू शकेल सहजीवन, पण सुशिक्षितांमध्ये दिसत नाही. शेवटी पैसा ही अशी गोष्ट आहे, की भल्याभल्यांना नात्याविषयी विचार करायला लावते. बरेच प्रश्न पैशापाशी येऊन थांबतात किंवा सुरू होतात. पण आजच्या स्त्रीचं जगणं व्यामिश्र आहे. त्यामुळे एकमेकांविषयीची संवेदनशीलता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तोच सुमित्रा मावशीनं या चित्रपटात मांडला आहे. 

सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या द्वयीविषयी काय वाटतं? त्यांचे सिनेमे, त्यांची काम करण्याची शैली याबद्दल काय सांगाल?

सुमित्रा मावशी आणि सुनील सुकथनकर यांनी अनेक उत्तमोत्तम सिनेमे दिले आहेत. एक नवीन माध्यम खुणावतंय, मी त्याच्यात काम करणार हे सुमित्रा मावशींना वयाच्या पन्नाशीनंतर जाणवलं.हा आदर्श सगळ्या स्त्रियांनी ठेवला पाहिजे. सिनेमा हा समाजाच्या संवेदनशीलतेला स्पर्श करण्याचं माध्यम आहे असं मानून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे लिहिले, दिग्दर्शित केले. त्यांच्यातली सकारात्मकता मला फार आवडते. मला त्यांच्यासारखं व्हावंसं वाटतं. या जोडीविषयी मला खूप आदर वाटतो. ज्या पद्धतीचे सिनेमे त्यांनी बनवले, त्या विषयीचं त्यांचं आकलन, समज, लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या संवेदनशीलतेला आवाहन करण्याची तळमळ त्यांच्या प्रत्येक सिनेमातून दिसते. समाजजागृतीसाठी सिनेमा असं काहीही मोठं नाव त्याला न देता खरोखरच प्रत्येक सिनेमातुन प्रत्येकानं त्या विषयी विचार केलाच पाहिजे असे विषय त्यांनी मांडले आहेत. स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे, असं यांना वाटतं. 

उत्तमोत्तम कलाकार या सिनेमात आहेत. एकूण अनुभव कसा होता?

- कलाकारांची उत्तम फौज या सिनेमात एकत्र आलेली आहे. हे सगळेजण मला सहकलाकार म्हणून लाभले, मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद वाटतो. त्यांच्याकडून मला शिकता आलं. अनेकांबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं. आमच्या सगळ्यांचं एक कुटुंब असल्यासारखं सेटवर वातावरण होतं. या विषयाबद्दल असलेलं आकलन, समाजाबद्दल असलेली निरीक्षणं घेऊन आल्यामुळे सगळ्याच्या कामाला अप्रतिम जीवंतपणा आला. मोहनकाका, सेवाताई, उत्तराताई, सुमित, सुबोध यांच्याशिवाय या सिनेमाची मला कल्पनाही करता येत नाही. माझ्यासाठी ही सुवर्णसंधी होती. या सिनेमामुळे मी माणूस म्हणून प्रगल्भ झाले.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive