शेफ विष्णू मनोहर यांची नवी इनिंग; आता दिसणार या भूमिकेत

By  
on  

खाद्यक्षेत्रात मुशाफिरी करत महाराष्ट्रातील पारंपरिक पाककृतींना जागतिक व्यासपीठ मिळवून देणारे ज्येष्ठ बल्लवाचार्य विष्णू मनोहर हे नाव आज घराघरांत सर्वपरिचित आहे. आपल्या हातच्या चवीने सगळ्यांची मनं तृप्त करत स्वयंपाकाला ग्लॅमर मिळवून देणारे विष्णू मनोहर आता चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत आपली कमाल दाखवायला सज्ज झाले आहेत. ‘Once मोअर या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने ते अभिनय क्षेत्रात पदार्पण करताहेत. तसेच या चित्रपटाच्या निर्मितीची धुराही त्यांनी सांभाळली आहे. येत्या १ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

आपल्या या इनिंगबद्दल बोलताना विष्णू मनोहर सांगतात की,‘मी खाद्यप्रांतात रमलो असलो तरी मला  अभिनयाच्या क्षेत्रातच करिअर करण्याची इच्छा होती.इच्छा दांडगी असेल तर ती पूर्ण होतेच. माझी अभिनयाची ओढ आता ‘Once मोअर चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे. या चित्रपटात मी एका राजाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या भूमिकेसाठी राजाच्या देहबोलीचा अभ्यास मी केला, त्यासोबत दिग्दर्शक नरेश बिडकर व सहकलाकार यांचं खास मार्गदर्शन मला या भूमिकेसाठी मिळालं. प्रत्येक सहकलाकाराने मला सांभाळून घेतलं. माझ्या प्रत्येक सीननंतर मी सेटवर बसून चित्रीकरण बघायचो. त्यातील बारकावे जाणून घेतले. या चित्रपटाचे ‘व्हीएफएक्स’ ही कमाल झाले आहेत. दिग्दर्शक नरेश बिडकर आणि मी एकमेकांना आधीपासून ओळखत होतो. आमचं खास असं ‘नागपूरी कनेक्शन’ आहे. हे क्षेत्र मला जरी नवखं नसलं तरी अभिनय करणे हा पूर्णपणे वेगळा भाग आहे. ‘Once मोअर चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा अनुभव मी घेतला. या चित्रपटाची निर्मितीही मी करतोय, त्यामुळे माझ्यासाठी हा डबल धमाकाच आहे.

या चित्रपटात विष्णू मनोहर यांच्यासोबत रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, नरेश बीडकर आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन श्वेता बिडकर यांनी केले आहे. धनश्री विनोद पाटील, सुहास जहागीरदार, निलेश लवंदे, विष्णू मनोहर आणि डॉ. विनित बांदिवडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभय ठाकूर, सुदिप नाईक, संपदा नाईक आणि व्ही.टी एच.एटंरटेन्मेंट सहनिर्माते आहेत.

Recommended

Loading...
Share