By  
on  

'पळशीची पीटी' या सिनेमात गुरु-शिष्यांचा असाही मिलाप

'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा चित्रपट आतापर्यंत देशोदेशींच्या नावाजलेल्या चित्रपट महोत्सवांमध्ये गाजला असून 'भागी' नावाच्या एका साधारण मुलीचा ऍथलेट होईपर्यंतचा प्रवास यात रेखाटण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते-दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी आपल्या गुरूंना या चित्रपटाच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

आपल्या देशात गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. शिष्यांनी गुरूंकडून जितकं ज्ञान संपादन करता येईल तितकं अगदी मन लावून शिक्षण घ्यायचं आणि मग स्वतःला आजमावण्यासाठी सज्ज व्हायचं. असंच काहीसं 'पळशीची पीटी' चित्रपटाच्यानिमित्ताने घडून आलंय असं म्हणता येईल. दिग्दर्शक धोंडिबा यांनी आपले गुरु छायाचित्रकार व संकलक संदीप जंगम आणि वेशभूषाकार राजेश संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट निर्मितीचे धडे गिरवले. विशेष म्हणजे मराठी मनोरंजन क्षेत्रात उडी घेण्यास ताकद देणाऱ्या या दोघा गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी त्यांना आपल्याच चित्रपटासाठी काम करण्यास भाग ही पडले. 'पळशीची पीटी' या चित्रपटाद्वारे गुरु-शिष्यांचा हा अनोखा मिलाप आपल्याला पाहता येणार असून संदीप जंगम आणि राजेश संकपाळ यांनी अनुक्रमे छायांकन आणि वेशभूषेची जबाबदारी यशस्वीरीत्या पेललेली आहे. 

नावाप्रमाणेच हटके कथानक असणाऱ्या धोंडीबा कारंडे लिखित 'पळशीची पीटी' या चित्रपटाची कथा 'भागी' नावाच्या मुलीभोवती गुंफलेली आहे. ग्रामीण भागातील उदासीन शिक्षणपद्धतीवर मार्मिकपणे भाष्य करणाऱ्या या चित्रपटात धोंडीबा कारंडे यांनी क्रीडाशिक्षकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तिन्ही क्षेत्रात धोंडीबाजींनी मुशाफीरी केली आहे.  

 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये नावाजला गेलेल्या 'पळशीची पीटी'मध्ये  ऍथलेट 'भागी'च्या प्रमुख भूमिकेत किरण ढाणे, राहुल मगदूम, तेजपाल वाघ, शिवानी घाटगे आदी कलाकार झळकणार आहेत. २३ ऑगस्टला 'पळशीची पीटी'  चित्रपटगृहांत जाऊन नक्की पाहावा असा आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive