पाहा Video : 'येरे येरे पैसा 2 ' मध्ये नव्या रंगरुपात 'अश्विनी ये ना... '

By  
on  

१९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या गंमत जंमत या चित्रपटातलं 'अश्विनी ये ना' हे गाणं विशेष गाजलं होतं. आता नव्या रंगरुपात जवळपास ३२ वर्षांनी हे गाणं पुन्हा एकदा प्रेक्षकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे ते "ये रे ये रे पैसा २" या चित्रपटातून हे गाणं प्रेक्षकांपुढे येत आहे. मुंबईत झालेल्या शानदार सोहळ्यात "ये रे ये रे पैसा २" चं म्युझिक लाँच करण्यात आलं. या वेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, चारुशीला साबळे, सचिन पिळगांवकर  उपस्थित होते. 'अश्विनी ये ना' या धमाकेदार गाण्यासह आणखी दोन गाणी या चित्रपटात आहेत. 

"अश्विनी ये ना...." या नव्या रंगरुपातल्या गाण्याविषयी अशोक सराफ आणि चारुशीला साबळे म्हणाले, 'हे गाणं ऐकून ३२ वर्षांपूर्वीची आठवण झाली. हे गाणं त्यावेळी ज्या पद्धतीने केलं, त्याचा ताल, चाल यासाठी संगीतकार अरूण पौडवाल यांना सलाम आहे. किशोर कुमार यांनी गायलेलं हे पहिलं मराठी गाणं  होतं. मराठी चित्रपट संगीतातलं हे माईलस्टोन गाणं आहे. सचिन पिळगांवकर यांनी या गाण्यातल्या स्टेप्स बसवल्या होत्या. हे गाणं चित्रीत करताना मजा आली होती. जवळपास एकाच टेकमध्ये प्रत्येक स्टेप ओके झाली होती. त्यावेळी हे गाणं इतकं लोकप्रिय होईल असं वाटलं ही नव्हतं. या गाण्याने खूप लोकप्रियता दिली.' 

तर गाण्याचा नृत्यदिग्दर्शक चित्रीकरणाच्या दिवशी न आल्याने आयत्यावेळी गरज म्हणून या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केल्याची आठवण सचिन पिळगांवकर यांनी सांगितली. 

अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज ची निर्मिती असलेल्या "ये रे ये रे पैसा २" या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. तर पटकथा आणि संवाद लेखन हृषिकेश कोळी आणि हेमंत ढोमे यांचं आहे.

"ये रे ये रे पैसा २" या चित्रपटाद्वारे एव्हीके  एंटरटेनमेंटच्या अमेय विनोद खोपकर यांनी आकाश पेंढारकर आणि अंकित चंदीरामानी यांच्यासोबत आता वितरण क्षेत्रातही पाऊल टाकले आहेत.

या चित्रपटात अभिनेते संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. संजय मेमाणे यांना छायांकन, फैसल इमरान यांनी संकलन, ट्रॉय आरिफ यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत, सुनाल नवले यांनी रंगभूषा, सचिन लोवलेकर यांनी वेशभूषा, राहुल-संजीव यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. गायक  अवधूत गुप्ते आणि मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात अश्विनी ये ना हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले असून इतर दोन गाणी शाल्मली खोलगडे, मिक्का सिंग यांनी गायली आहेत. 

 
येत्या ९ ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Recommended

Loading...
Share