By  
on  

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ‘चित्रभूषण’ पुरस्कार जाहीर, विक्रम गोखले यांचा सन्मान

चित्रपट क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारे ‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार बुधवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे जाहीर करण्यात आले. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांनी याची घोषणा व पुरस्काराची माहिती यावेळी दिली.

 

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘चित्रभूषण’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सुषमा शिरोमणी तसेच ज्येष्ठ कलादिग्दर्शक श्रीकांत धोंगडे व निर्माते किशोर मिस्कीन यांना जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ आणि ५१,०००/- रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांचे वितरण मंत्री महोदय व मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवार १९ ऑगस्टला रविंद्र नाट्यमंदिर येथे सायंकाळी ६.०० वा. रंगणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येईल.रमेश साळगांवकर, संजीव नाईक, विलास उजवणे, आप्पा वढावकर, नरेंद्र पंडीत, प्रशांत पाताडे, दिपक विरकूड, विलास रानडे, विनय मांडके, जयवंत राऊत, सतीश पुळेकर, प्रेमाकिरण, सविता मालपेकर, चेतन दळवी, अच्युत ठाकूर, वसंत इंगळे या कलाकर्मीना चित्रकर्मीपुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ आणि ११,००० /- रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका चैत्राली डोंगरे यांनी प्रास्ताविक केले तर संचालिका वर्षा उसगांवकर यांनी यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा यावेळी सांगितली. या कार्यक्रमासाठी उदयोन्मुख कलाकारांना यावेळी सादरीकरणाची संधी मंडळातर्फे देण्यात येणार आहे. प्रमुख कार्यवाहक सुशांत शेलार यांनी आभारप्रदर्शन केले. सहकार्यवाहक विजय खोचीकर, संचालक सतीश रणदिवे यावेळी उपस्थित होते.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive