सेल्फीसाठी असलेली गर्दी, मराठी सिनेमाला का नसते? भाऊ कदमचा सवाल

By  
on  

भाऊ कदम सध्या त्याच्या ‘व्हिआयपी गाढव’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. भाऊ जातो तिथे त्याच्याभोवती चाहत्यांचा गराडा पडतो. त्यातील अनेक चाहते भाऊसोबत सेल्फी घेण्याचाही प्रयत्न करत असतात. अशाच एका कार्यक्रमात एका चाहत्याने भाऊचा सेल्फी घेण्यासंबंधी त्याच्याकडे आग्रह धरला.

आसपासची गर्दीही जास्त होती. अशा वेळी भाऊ त्या चाहत्यावर भडकला. भाऊ त्या चाहत्याला म्हणाला, ‘कशाला हवा आहे तुला सेल्फी, काय करणार या सेल्फीचं?’ त्या चाहत्यालाही यावर काय बोलावं हे सुचलं नाही. भाऊ पुढे म्हणतो, चाहते आमच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी कायम गर्दी करताना दिसतात. पण मराठी सिनेमे पाहण्यासाठी मात्र अजिबात गर्दी नसते.’ ज्यादिवशी मराठी रसिक मराठी सिनेमांसाठी गर्दी करेल त्यावेळी मराठी सिनेमा मोठा होईल.’ भाऊच्या व्हिआयपी या सिनेमाची चाहते वाट पाहात आहेत. काही दिवसंपूर्वी तो ‘नशीबवान’ या सिनेमात दिसला होता.

कल्पराज क्रिएशन प्रस्तुत, ‘व्हिआयपी गाढव’चे डॉ. रणजीत सत्रे आणि डॉ. प्रसन्न देवचके हे निर्माते आहेत तर संजय पाटील  हे दिग्दर्शक आहेत. भाऊ सोबत या सिनेमात विनोदाची पखरण करायला शितल अहिरराव, भारत गणेशपुरे, विजय पाटकर सोबत पूजा कासेकर, शरद जाधव, शिल्पी अवस्थी हे कलाकार देखील सज्ज झाले आहेत. हा सिनेमा 13 सप्टेंबरला रिलीज होत आहे.

 

Recommended

Loading...
Share