By  
on  

मुंबईच्या सुवर्णकाळाची साक्ष असलेलं पहिलं जुळं सिनेमागृह जाणार काळाच्या पडद्याआड

मुंबईला सिनेमागृहांची एक संस्कृती आणि परंपरा आहे. परंतु काळाच्या ओघात मल्टिप्लेक्स आले आणि सिंगल स्क्रीन थिएटर मागे पडू लागले. मुंबईच्या सुवर्णकाळातील असंच एक थिएटर आता नामशेष होणार आहे. या थिएटरचं वैशिष्ट्य असं की हे मुंबईतील पहिलं जुळं थिएटर म्हणून प्रसिद्ध होतं. या थिएटरचं नाव 'गंगा जमुना'. 

एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या माहितीनुसार  २००० साली बंद झालेल्या या थिएटरची इमारत धोकादायक असल्याने ही इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत आज जरी जुळी किंवा तिळी सिनेमागृह असली तरी गंगा जमूना थिएटर पासून याची सुरूवात झाली होती. त्या काळात संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या थिएटरची सुरुवात १९७१ साली आलेल्या देवानंदच्या 'हरे राम हरे कृष्णा' या सिनेमापासून झाली होती.  

या विषयी ज्येष्ठ सिनेतज्ज्ञ आणि पत्रकार दिलीप ठाकूर यांना विचारलं असता ते म्हणाले,''त्या सिनेमाचं वैशिष्ट्य असं की तिथे मॅटिनी शो ला राजश्री प्रोडक्शनचे  एकामागोमाग एक सिनेमे रिलीज व्हायचे आणि ते ५० आठवडे चालायचे. थिएटर छान प्रशस्त होतं. बाल्कनी वैगरे होती. सुरुवातीच्या काळात तिकीट दर अगदीच कमी होते. १ रुपया ६५ पैसे पासून तिकीट दराची सुरुवात होती. नंतर ते वाढत गेले. खूप सिनेमे तिथे सिल्व्हर ज्युबिली झाले.''

या थिएटरमध्ये अनेक सिनेमांनी स्वतःचे रौप्य महोत्सव साजरे केले. अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेला १९७६ साली प्रदर्शित झालेला ‘जवळ ये लाजू नको’ हा या थिएटर मध्ये प्रदर्शित झालेला एकमेव मराठी सिनेमा होय. सिनेमांच्या ऐतिहासिक परंपरेचं प्रतीक असलेलं मुंबईतील आणखी एक थिएटर नामशेष झालं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive