‘मन उधाण वारा’ सिनेमात झळकणार ही नवी जोडी

By  
on  

चित्रपटातल्या नव्या जोड्यांची चर्चा नेहमी होत असते. एखादी नवी जोडी येणार असेल तर प्रेक्षकही त्या जोडीची उत्सुकतेने वाट पाहतात. मोनल गज्जर, ऋत्विज वैद्य ही अशीच एक नवी जोडी ‘मन उधाण वारा’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. येत्या ११ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ आणि ‘लोका एंटरटेनमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ‘पेन मुव्हीज्’चे जयंतीलाल गडा यांची प्रस्तुती असलेला हा चित्रपट सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी दिग्दर्शित केला आहे.

गुजराती कौटुंबिक पार्श्वभूमी असललेली मोनल ब मध्यप्रदेशातल्या भोपाळ मध्ये शिकलेला ऋत्विज यांचा मराठीशी तसा फारशा संबध नसल्याने ‘मन उधाण वारा’ हा चित्रपट त्यांच्यासाठी एक आव्हान होते. मोनलने याआधी गुजराती, तामिळ, तेलगू अशा बऱ्याच भाषांमध्ये काम केलं आहे. तर ऋत्विजने अनेक हिंदी लघुपटांचे दिग्दर्शन व त्या लघुपटांमध्ये अभिनयसुद्धा केला आहे. या दोघांचे काम पाहिल्यानंतर निर्माते सतीश कौशिक यांनी या दोघांची निवड चित्रपटासाठी केली.

आपल्या या अनुभवाबद्दल बोलताना मोनल व रित्विज सांगतात की,  ‘आम्ही नेहमीच आशयसंपन्न भूमिकांना प्राधान्य दिलं असल्याने सतीशसरांनी आम्हाला या भूमिकेबद्दल विचारल्यानंतर आमच्यासाठी ही निश्चितच आनंदाची बाब होती. नात्यातील हळूवार क्षणांना रेखाटणारा हा चित्रपट असून ‘फ्रेश जोडी’ ही या चित्रपटाची गरज होती. त्यानुसार या चित्रपटासाठी आमची निवड झाली. आमच्या केमिस्ट्री बाबत विचाराल तर दोघंही एकमेकांना तसे नवखे असलो तरी या कला माध्यम आमच्यासाठी नवे नाही. त्यामुळे एकत्र काम करताना मजा आली. दिग्दर्शक संजय मेमाणे यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला आमच्या भूमिका समजावून सांगितल्याने एकमेकांच्या कृतीला मिळणाऱ्या प्रतिक्रियांचा सूर उत्तम जुळला होता. प्रेक्षकांनाही चित्रपटात आमचा हा जुळलेला सूर नक्कीच दिसेल. तसेच अनुभवी कलाकारांबरोबर काम करताना आम्हाला खूप काही शिकायला मिळालं.

 

मोनल गज्जर, ऋत्विज वैद्य या नव्या जोडीसह या चित्रपटात किशोर कदम, उत्तरा बावकर, सागर कारंडे, शर्वरी लोहकरे, डॉ.शरद भुताडिया, विनोद कुलकर्णी, भारती पाटील, वैभव राजाध्यक्ष, साक्षी गांधी, ज्युलिया मोने, अनुराधा अटलेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. निशांत कौशिक, अक्षय गडा, धवल गडा चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. छायांकन मिलिंद जोग तर संकलन कृष्णत घार्गे यांचे आहे.

११ ऑक्टोबरला ‘मन उधाण वारा’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. 

Recommended

Loading...
Share