नवरात्रीला नवरूपे तू : पाचवी माळ स्वाभिमानी 'अनिता'

By  
on  

                   
स्त्री दुर्गा असते, स्त्री सरस्वती असते, स्त्री रेणुका असते व ती कायम चराचरात निरनिराळ्या रूपात असते. कधी ती राष्ट्रपती असते, तर कधी मुख्यमंत्री, कधी उच्च पदावर विराजमान झालेली अभियंता असते तर कधी कधी ती असते एक सर्वसामान्य 'मोलकरीण बाई'. कोणत्याही रूपात तिच्यातील स्त्रीत्व ती जपते. अशीच एक स्त्री अर्थात देवीआईचे रूप म्हणजे आपली 'मोलकरीण बाई' मालिकेतील अनिता.

अनिता मोलकरीण आहे, अनेकांच्या घरची कामे करायला ती जात असते. पोटापाण्यासाठी आनंदाने हे सगळं ती करते. एका छोट्याशा वस्तीतील चाळीत राहणारी ही सर्वसामान्य घरातील स्त्री. जिचे ती, नवरा, मुलगा आणि मुलगी असे चौकोनी कुटुंब आहे. सोबतच वस्तीतील शेजारी, तिच्या मैत्रिणी अंबिका, दुर्गाबाई, गुंजण इत्यादी सर्व तिच्यासाठी सर्वस्व आहेत. नवरा खास काही कमावत नाही, मुलगा उडाणटप्पू, मुलीचे शिक्षण सुरू, ह्या सगळ्यात अनिता मात्र घरासाठी सतत झटतेय. काबाडकष्ट करून आपल्या संसाराचा गाडा रेटतेय. तिच्या फार काही अपेक्षा नाहीत किंबहुना तिच्या अपेक्षाच नाही. तिचं चित्त फक्त तिच्या कुटुंबावर स्थिरावलेलं आहे. कित्येकदा घरात ताणतणावाचे वातावरण असतानादेखील ती आपल्या कामाचा दिवस चुकवत नाही कि कधी कामात कसूर ठेवत नाही. ती जिथेजिथे घरकाम करायला जाते तेथील लोकांशी सुद्धा तिचं एक वेगळं भावनिक नातं तिनं तयार केलं आहे. त्यांच्या सुख-दु:खात, अडीअडचणीत सुद्धा ती आपल्या कुटुंबाप्रमाणेच लक्ष देते. मग अगदी नुकतंच ती जिच्याकडे घरकामाला जात असलेल्या व्यक्तीच्या म्हणजेच आदितीच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर आलेले दु:ख तिने आपले मानले.

आदिती गेली पण तिच्या लहान मुलीचे काय होईल ? तसेच जन्माला आलेल्या त्या बाळराजाचे काय होईल? ह्या विचाराने अनितामधील आई व्याकूळ झाली. तिचा तो शोक तिच्यातील मातृत्वाची खूण होती. तिच्याकडे पाहिलं कि वाटतं, आपण आपली छोटीछोटी दु:ख किती कवटाळून बसतो. पण समाजातील अनितासारख्या स्त्रिया आज कितीतरी बीकट परिस्थितीत असूनही कष्ट करत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी पडेल ते काम करण्याची तयारी ठेवत आहेत. पण एक गोष्ट मात्र नमूद करू इच्छितो, अनिता मोलकरीण आहे पण स्वाभिमानी देखील आहे. तिच्यावर खोटा चोरीचा आरोप लागला तर तिची स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठीची झालेली तगमग पाहून तिच्यातील स्वाभिमानी स्त्रीचे दर्शन घडते. दुर्गाबाईवर चालून आलेले संकट डोळ्यांसमोर पाहताना धीटपणे ती गुंडांशी देखील दोन हात करायला गेली. एरवी शांत, समंजस असणारी अनिता तेव्हा मात्र रौद्र रूपात होती. तिच्यातील असामान्य शक्तीचे ते एक रूप होते. ती कुठे राहते, कोणत्या परिस्थितीत राहते त्यापेक्षा ती किती आनंदात राहते, हे जास्त महत्त्वाचे आहे. तिचं जग तिने सीमित ठेवलं असलं तरी त्यात छोट्याछोट्या गोष्टींत ती आनंद मानते आणि म्हणूनच ती सामान्य असली तरी तिच्यातील एक 'असामान्यत्व' दर्शवते.

कधीकधी वाटतं, जास्त शिकलो कि जास्त अक्कल आली आहे. पण अनिताला पाहिलं कि आपण अजूनही तिच्यासमोर लहानच आहोत असं वाटतं. तिच्यातील सामंजस्य, जिद्द, कष्ट करण्याची तयारी, आणि सच्चेपणा आपणही अंगीकारावेसे वाटते. आपल्यावर नाहीये संसाराची जबाबदारी, आपल्यावर नाहीये मुलीच्या शिक्षण आणि लग्नाचा खर्च, आपल्या समोर न कमावणारा नवराही नाहीये आणि आपल्याकडे एक उडाणटप्पू मुलगाही नाहीये; हे सर्व आहे अनिताकडे. तिच्याकडे गरीबी आहे, न संपणारे कष्ट आहेत, अनेक अडचणी आहेत पण ह्या संकटांच्या उन्हात तिची सावली मात्र मोठी आहे. आणि त्या सावलीमुळेच तिच्या जवळचे सर्व शीतल सुखात आहेत, आनंदात आहेत. 'अनिता' हे लेखकाने जन्माला घातलेले एक निव्वळ काल्पनिक पात्र नव्हे; तर ती एक खरीखुरी व्यक्ती आहे, ह्यात तिळमात्रही शंका नाही. समाजात आज अनेक अनिता आहेत, त्यांच्या अनेक कहाण्या आहेत पण 'मोलकरीण बाई' मधील ही अनिता बघून अनेकींनी जगण्याची आणि जगण्यासाठी धीटपणे लढण्याची व कष्ट करण्याची प्रेरणा नक्कीच घेतली असेल. ह्या स्वाभिमानाने जगणाऱ्या अनिताला नवरात्रीच्या आजच्या माळेचा नमस्कार. 

Recommended

Loading...
Share