By  
on  

स्वराज्यातील स्त्रीशक्ती शत्रूला देणार 'फत्तेशिकस्त'

'फर्जंद' या ऐतिहासिक सिनेमात कोंडाजी फर्जंद यांनी गाजवलेल्या पराक्रमाची यशोगाथा मांडल्यानंतर लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'फत्तेशिकस्त' या आगामी मराठी सिनेमात स्वराज्यातील पहिला 'सर्जिकल स्ट्राइक' पहायला मिळणार आहे. आजवरच्या बऱ्याच लढायांमध्ये स्त्रियांनीही पुरुषांइतकंच योगदान दिल्याची साक्ष इतिहास देतो. स्वराज्यातील लढायाही याला अपवाद नाहीत. शत्रूची बित्तंबातमी काढण्यापासून, हेरगिरी करण्यापर्यंत आणि त्यांची दिशाभूल करून प्रत्यक्ष लढाईत तलवारबाजी करण्यापर्यंत सर्वच पातळ्यांवर स्त्रीयांनी आपली शक्ती दाखवत शत्रूंना सळो की पळो करून सोडलं आहे. 'फत्तेशिकस्त' सिनेमातही स्त्रीशक्तीचे विविध पैलू पहायला मिळणार आहेत. यापैकी काही स्त्रिया पडद्यावर वावरताना दिसणार आहेत, तर काहींनी पडद्यामागं राहून आपलं कौशल्य पणाला लावत 'फत्तेशिकस्त' पडद्यावर सादर करण्याच्या आव्हानात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

या आणि अशा बऱ्याच कारणांमुळं ए.ए फिल्म्सचं सहकार्य व आलमंड्स क्रिएशन्सची प्रस्तुती असलेला 'फत्तेशिकस्त' एक प्रकारे स्त्रीशक्तीचा नारा देणारा सिनेमा असल्याचं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. चतुरस्र अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या सिनेमात पुन्हा एकदा राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहेत. छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर यापूर्वी राजमाता साकारल्यानंतर त्या पुन्हा यात जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहेत. इतिहास घडविणाऱ्या या राजमातेचं लढवय्ये रूप या सिनेमात पहायला मिळेल. या सोबत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ‘फुलवंती’ या एका वेगळ्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाजी महाराजांच्या पत्नी ‘सोयराबाईं’ च्या भूमिकेत अभिनेत्री रुची सावर्ण दिसणार आहे. अनेक मराठी आणि हिंदी मालिका गाजवणारी रुची सावर्ण 'फत्तेशिकस्त' मधून मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे. मोगल साम्राज्याची ‘बडी बेगम’ची तडफदार व्यक्तिरेखा अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी हिने रंगवली आहे. मोगल साम्राज्यातील वफादार सरदार ‘रायबाघन’ च्या भूमिकेत अभिनेत्री तृप्ती तोरडमल तर शाहिस्तेखानाची सून ‘बहूबेगम’च्या भूमिकेत नक्षत्रा मेढेकर दिसणार आहे. या साऱ्यांनी साकारलेल्या या ऐतिहासिक व्यक्तिरेखा स्मरणात राहणाऱ्या ठरणार आहेत.

पडद्यावर दिसणाऱ्या या अभिनेत्रींच्या जोडीला पडद्यामागं राहून अनेक दाक्षिणात्य चित्रपटांसाठी काम करणाऱ्या ‘डीओपी’ रेशमी सरकार यांनी छायांकनाची जबाबदारी चोख बजावली आहे. शिवकालीन गड-किल्ल्यांच्या जोडीला स्वराज्यातील पहिला सर्जिकल स्ट्राइकही प्रेक्षकांना त्यांच्या नजरेतून पहायला मिळणार आहे. ऐतिहासिक व्यक्तिरेखांचा प्राण असणारी वेशभूषा पौर्णिमा ओक यांनी, तर रंगभूषा सानिका गाडगीळ यांनी केली आहे. या दोघींनीही अतिशय कल्पकतेच्या बळावर स्वराज्यातील व्यक्तिरेखांना गेटअप आणि मेकअप केला आहे.

अजय आरेकर व अनिरुद्ध आरेकर 'फत्तेशिकस्त'चे निर्माते आहेत. संकलन प्रमोद कहार यांचं असून, कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी उत्कर्ष जाधव यांनी सांभाळली आहे. संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी यांनी दिलं असून, गीतरचना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, वि. स. खांडेकर, दिग्पाल लांजेकर यांची आहेत.

१५ नोव्हेंबरला 'फत्तेशिकस्त' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive