By  
on  

शूटिंगच्या शेवटच्या दिवशी 'खारी बिस्किट'च्या बच्चेकंपनीला मिळालं संजय जाधव यांच्याकडून सरप्राईज गिफ्ट

संजय जाधव दिग्दर्शित 'खारी बिस्कीट'ची सर्वत्र चर्चा आहे. संजय जाधव यांचा आजवरचा वेगळा सिनेमा म्हणून 'खारी बिस्कीट'कडे पाहिलं जात आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रथमच इतक्या बालकलाकारांसोबत संजय जाधव यांनी काम केले आहे. 'खारी बिस्कीट' हा संजय जाधव यांचा ५० वा सिनेमा आहे. म्ह्णूनच हा सिनेमा संजय जाधव यांच्यासाठी स्पेशल आहे. 

एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये या सिनेमात बच्चेकंपनीसोबत काम करण्याच्या अनुभवावर संजय जाधव म्हणाले,''लहान मुलांसोबत काम करणं खूप अवघड असतं. त्यांच्या कलाकलाने आपल्याला काम करावं लागतं. परंतु जेव्हा तुम्ही त्यांना समजून घेता तेव्हा त्यांच्यासोबत काम करणं सोप्पं होतं. या सिनेमात खारी, बिस्कीट, मांजा, पिलेट आदी भूमिका करणाऱ्या बालकलाकारांशी माझी चांगली मैत्री झाली. त्यामुळे त्यांच्यासाठी शूटिंगच्या शेवटच्या दिवशी केक कापून रॅपअप पार्टी करायची ठरवली.''

 

संजय जाधव या मुलाखतीत पुढे म्हणाले,''केक कापल्यानंतर मात्र या लहान मुलांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण आमच्या प्रोडक्शन टीमने या पाचही लहान मुलांसाठी सायकल आणल्या होत्या. आमच्या या छोट्याश्या सरप्राईज गिफ्टमुळे लहान मुलांच्या चेहऱ्यावर आलेलं समाधान मी शब्दात सांगू शकत नाही'' अशा प्रकारे संजय जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

'झी स्टुडिओज' आणि 'ड्रीमिंग ट्वेन्टी फॉर सेव्हन' यांनी 'खारी बिस्कीट' सिनेमाची निर्मिती केली असून येत्या १ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive